Pimpri : प्रतिकूल परिस्थितीतही देशासाठी पदके मिळविणा-या खेळाडूला आर्थिक मदत करून स्वातंत्र्यदिन साजरा

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज – एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स येत्या 7 ते 15 सप्टेंबर 2018 दरम्यान मलेशिया मधील पेनांग येथे होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आंतरराष्ट्रीय प्रौढ खेळाडू पराग पाटील यांची जोरदार तयारी सुरु आहे. आजवर त्यांनी देशासाठी 11 आंतरराष्ट्रीय पदके मिळविली आहेत. मात्र शासनाने त्यांची कसलीही दखल घेतली नाही. खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव उंचावणा-या पराग पाटील यांना आर्थिक मदत करून इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने त्यांना मदत करत स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.

निगडी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी दलाल, सचिव रेखा मित्रगोत्री, आयएसओ सोनाली जयंत, डिस्ट्रिक्ट ट्रेजरर मुक्ती पानसे, जयश्री कुलकर्णी, सुजाता ढमाले, डॉ. रंजना कदम, प्रतिमा देशमुखे, स्मिता इळवे, विद्या उदास, नेहा देशमुख, अॅड. अर्जुन दलाल आदी उपस्थित होते. भारतीय बॉक्सिंग संघाच्या फिजिओथेरपिस्ट उमा कर्णिक देखील यावेळी उपस्थित होत्या. कर्णिक यांनी भारतीय बॉक्सिंग संघासह धवल कुलकर्णी, युवराज सिंग, विनेश पोगट, सीमा पुनिया, दीपा करमकर, बेमबेम देवी, मेरी कॉम, सर्जूबाला देवी यांच्यासोबत फिजिओथेरपिस्ट म्हणून काम केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पेनांग येथे होणा-या एशिया पॅसिफिक मास्टर गेम्समध्ये जगभरातून 57 देश सहभागी होणार आहेत. या स्पर्धांमध्ये 30 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले खेळाडू सहभाग घेऊ शकतात. पाटील यांनी या स्पर्धेत 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, लांब उडी आणि तिहेरी उडी या चार मैदानी स्पर्धा प्रकारांमध्ये सहभाग घेतला आहे. भारतातून एकूण 30 खेळाडू या स्पर्धेसाठी जाणार आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने पाटील यांना 40 हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांच्या प्रयत्नांना मदतीचे पंख लावले आहेत.

पराग पाटील यांनी 2013 साली इटली येथे झालेल्या एशिया पॅसिफिक मास्टर गेम्समध्ये एक रौप्य, दोन कांस्य पदके मिळवली आहेत. 2015 साली ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य पदके मिळवली आहेत. 2017 साली न्यूझीलंड येथे आयोजित एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स स्पर्धेत लांब उडी मारताना त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. दुखापतच्या दुसऱ्या दिवशी त्यांची तिहेरी उडी स्पर्धा होती. गुडघ्याची दुखापत गंभीर असताना देखील त्यांनी चांगली कामगिरी करत भारतासाठी एक रौप्यपदक मिळवले. आर्थिक मदत करून त्यांच्या या कामगिरीला इनरव्हील क्लबने शाबासकीची थाप दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.