Mumbai : प्रत्येक शहरात स्वच्छतेविषयी जागर झाला पाहिजे; स्वच्छतेची फॅशन झाली पाहिजे – आदित्य ठाकरे 

भारतातील कचरा व्यवस्थापन विषयावर फॅशन शो

एमपीसी न्यूज – स्वच्छता सर्वांना आवडते. मात्र ती करताना सर्वांचा हात आखडता असतो; परंतु प्रत्येक शहरात स्वच्छतेचा जागर झाला पाहिजे, असे मत पर्यावरण मंत्री व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबई प्लास्टिक आणि कचरा मुक्त करण्यासाठी पालिकेने वरळीच्या एनएससीआय येथे आयोजित केलेल्या स्वच्छता पारितोषिक वितरण समारंभ आणि कचरा पुनर्वापर फॅशन शो कार्यक्रमात ते बोलत होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने आणि माय अर्थ फांउडेशन व दीपाली सय्यद फाउंडेशनच्या वतीने “मिस आणि मिसेस माय अर्थ २०२०” मुंबई येथे फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. नेक्सिकॉनच्या वतीने या फॅशनचे शोचे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात आले होते. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते नेक्सिकॉनच्या लोगोचे अनावरण करण्यात आले होते.

या खास कार्यक्रमाला महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महापौर बृहन्मुंबई महानगरपालिका किशोरी पेडणेकर, माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद-भोसले, नॅशनल सॉलिड वेस्टचे नितीन देशपांडे, नेक्सिकोन चे विशाल थिगळे, घनकचरा विभागाचे सहआयुक्त अशोक खैरे तसेच उपमहापौर, नगरसेवक व महापालिकेतील अधिकारी वर्गाने उपस्थिती लावली.

फॅशन शोमध्ये ३० महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तसेच स्वछता अभियान अंतर्गत मुंबईतील १०० संस्थांचा सन्मान झाला. यावेळी ओला कचरा घरच्या घरी कसा जिरवता येईल यासाठी प्रदर्शनदेखील भरविण्यात आले होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, आपली लोकसंख्या पाहता प्रत्येकाने दहा फूट जागा कचरा मुक्त केल्यास ही समस्या कायमची दूर होईल. केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र, देश आणि जगाला हा उपक्रम आदर्श ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कचराकुंडी बाहेर कचरा दिसलाच नाही पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी असे आवाहनही त्यांनी केले. केवळ मुंबईच नाही तर राज्यातील सर्व पालिकांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे, यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सर्व पालिका आयुक्तांची बैठक घेऊन सूचना दिल्याचेही ते म्हणाले. पर्यावरण खाते देखील शहर स्वच्छ करण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

कचरा व्यवस्थापन मार्गदर्शनासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या टाकाऊ प्लास्टिक आणि इतर वस्तूंपासून तयार केलेल्या अनोख्या फॅशन शो ने सर्वांचे लक्ष वेधले होते. यामध्ये रॅम्पवॉक मॉडेलनी पाण्याच्या प्लास्टिक बॉटल, वेफर्सचे वेष्टन, कापडी पिशव्या, रद्दी पेपर आदींपासून बनवलेले ड्रेस घालून अनोखे रॅंप वॉक केले. ‘माझा कचरा-माझी जबाबदारी’ असा संदेश यातून देण्यात आला. कचरावेचक महिलेच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.