Chinchwad News : माझ्याकडे येणारा प्रत्येक पीडित आशेने येतो, त्याची निराशा कधीच होऊ देणार नाही : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज : मला भेटण्यासाठी खूप लोकांची गर्दी असते. त्यामुळे सर्वांना भेटण्यासाठी वेळ लागतो. अशा प्रकारची तक्रार काहीजण करतात. पण माझ्याकडे येणारा प्रत्येक पीडित व्यक्ती हा मोठ्या आशेने येतो. येणा-या प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन त्याच्या समस्येचं समाधान करणं ही माझी जबाबदारी आहे. माझ्याकडे येणा-या नागरिकांची निराशा मी कधीच होऊ देणार नाही, अशा आशयाची फेसबुक पोस्ट पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केली आहे.

दमदार कामगिरी, अनोखा अंदाज, कार्यतत्पर आणि क्रीडाप्रेमी म्हणून आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ओळख आहे. प्रत्येक अडचण आणि आव्हानाला ते खिलाडू वृत्तीने घेतात अशा अनेकदा चर्चा होतात. त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याकडे आपले गा-हाणे मांडण्यासाठी अनेक नागरिक दररोज पोलीस आयुक्त कार्यालयात गर्दी करतात. त्या सर्वांना आयुक्त भेटतात. मात्र, अनेकदा आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट होण्यासाठी नागरिकांना काही वेळ वाट बघावी लागते. यामुळे काही नागरिक नाराज देखील होतात. त्यावर आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘तुम्हाला भेटण्यासाठी खूप गर्दी असते. दररोज शंभरावर लोक भेटण्यासाठी येतात. आम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागते, अशी तक्रार अनेकजण करतात.

त्या तक्रार करणा-यांना मी म्हणतो, ते शंभर लोक सुद्धा तुमच्याप्रमाणेच आशेने आलेले आहेत. वरिष्ठ अधिकारी म्हणून मी त्यांच्या अडचणी किमान सन्मानाने एकूण घ्याव्या, अशी त्यांची इच्छा असते. दूरवरून नागरिक मला भेटण्यासाठी येतात, मी कदाचित त्यांची समस्या सोडवीन हा उद्देश त्यांचा असतो. कारण त्यांनी इतरांकडून ऐकलेलं असतं की, मी कुणालाही न भेटता जात नाही.

अशा वेळी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी एकसमान आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला मी तेवढ्याच गांभीर्याने ऐकतो. अनेक वेळेला दुस-या प्रदेशातील लोक सुद्धा मला मदतीसाठी संपर्क करतात. त्याहीवेळी त्यांना माझ्या परीने जास्तीतजास्त मदत करण्याचा माझा हेतू असतो.

दिवसाला शंभर लोकांना भेटल्याने त्यांच्या अडचणी कमी होणार आहेत अथवा पोलिसांची प्रतिमा चांगली होणार आहे, तर मी सकाळी नऊ पासून रात्री अकरा वाजेपर्यंत काम करायला तयार आहे. एका अधिका-यासाठी आशा आणि सन्मान या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. नागरिक आशेने माझ्याकडे येतात. त्यांची निराशा मी होऊ देणार नाही. त्यामुळे जर वेळ लागत असेल तर लक्षात ठेवा समोरचा प्रत्येकजण आपल्याप्रमाणेच समस्या मांडण्यासाठी आशेने माझ्याकडे आलेला आहे.”

या पोस्टमधून आयुक्तांनी नागरिकांना मोलाचा सल्ला दिला आहे. नागरिक माझ्याकडे आशेने येतात, त्यांना मी सन्मानाने ऐकतो त्यामुळे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होते. प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी समान आणि तितकाच महत्वाचा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.