Pune – ससूनमध्ये मृतदेहांची अदलाबदल; नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप

एमपीसी न्यूज – दोन महिलांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याची घटना आज मंगळवारी (दि.17) सकाळी ससून रुग्णालयाच्या शव विच्छेदन विभागात घडली. नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बदलून आलेला मृतदेह ससूनमध्ये परत केला.
जया सपकाळ (वय 39, रा़ रामटेकडी) व मयुरी काळे (वय 20) यांच्या मृतदेहांची अदला बदल झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन करण्यासाठी जया सपकाळ व मयुरी काळे यांचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारात आणण्यात आला होता. दोघींनीही गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर दोन्ही घटनांमध्ये साम्य असल्याने ही अदला बदल झाली असल्याचे ससून रुग्णालयातून सांगण्यात आले़.

आज सकाळी साडेदहा वाजता मयुरीचे नातेवाईक ससून रुग्णालयातील शवागारात आले़ व त्यांनी मयुरीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. तर दुपारी एकच्या सुमारास जयाचा मृतदेह नेण्यासाठी तीचे नातेवाईक आले असता मृतदेह पाहताच तो मृतदेह जयाचा नसून दूस-याच महिलेचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे लक्षात येताच तिथे एकच खळबळ उडाली. तर तिकडे अंत्यसंस्कारासाठी मयुरीचा मृतदेह घेऊन गेलेल्या नातेवाईकांनाही हा मृतदेह मयुरीचा नसल्याचे लक्षात आले़ तेव्हा त्यांनी ससून रुग्णालयातून फोन केला व सर्व प्रकार उघडकीस आला. मयुरीचे नातेवाईकांनी तिचा मृतदेह पुन्हा ससूनमध्ये आणला ते येईपर्यत मात्र जयाच्या नातेवाईकांना ससून रुग्णालयात ताटकळत थांबावे लागले.

मात्र घडलेल्या प्रकारामुळे दोन्ही कुटूंबियांना प्रचंड मनस्ताप झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.