Chinchwad : ‘आदर्श गणेशोत्सव’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवातील अपप्रकार रोखणे आणि धर्मशास्त्रानुसार तो साजरा करणे या उद्देशाने ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’ राबवली जात आहे.

या अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर, तळेगाव दाभाडे, जुन्नर परिसरात गणेशोत्सवापूर्वी, गणेशोत्सवाच्या कालावधीत आणि विसर्जनाच्या वेळी विविध माध्यमातून प्रबोधनात्मक उपक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली. शहरातील गणेशोत्सव मंडळे, रहिवासी सोसायट्या, शाळा आदींमध्ये विविध प्रकारे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले गेले.

यामध्ये आदर्श गणेशोत्सव कसा असावा, गणेशमूर्ती कशी असावी, श्री गणेश पूजनाचे शास्त्र याविषयी शास्त्रोक्त माहिती देणारी व्याख्याने त्याचबरोबर धर्मशास्त्रानुसार आचरण, धर्मशिक्षणाची आवश्यकता, राष्ट्र आणि धर्म यांविषयक प्रबोधनात्मक माहिती देणारी व्याख्यानेही घेण्यात आली. मोहिमेस गणेशोत्सव मंडळ आणि समाजातील नागरिक यांच्याकडून सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.

अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये क्रांतिकारकांचे सचित्र माहिती दर्शवणारे प्रदर्शन भरविण्यात आले. तसेच गणेशोत्सव विषयी धर्मशिक्षण देणाऱ्या सिडीच्या माध्यमातून केबलवरूनही जनजागृती करण्यात आली. याशिवाय रावेत घाट, बिर्ला हॉस्पिटल जवळील घाट, काकडे पार्क येथील घाट, पिंपरीगावातील घाट, औंध येथील घाट याठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक धरून भाविकांचे प्रबोधन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.