Pune News : लाॅकडाऊनमधून शनिवार वगळा; खासदार बापट यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांचा दर तीन टक्यांपेक्षा खाली आल्याने लाॅकडाऊन विकएन्डमधून शनिवार वगळावा व व्यापा-यांना दुकानाच्या वेळा वाढवून द्याव्यात, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी रविवारी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

दुकानांची वेळ सकाळी दहा ते रात्री आठ अशी करावी, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली. खासदार बापट यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यासह पुण्यातील विकेंड लॉकडाऊनमधून शनिवार वगळण्याचा निर्णय दोन दिवसांत घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. असे असताना आपण शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम तूर्त “जैसे थे” राहणार असल्याचा आदेश काढला आहे.

वास्तविक शहरातील कोरोना बाधितांचा दैनंदिन दर हा 3 % पेक्षाही कमी असल्याने शहरातील निर्बंध शिथिल करायला हवे होते. परंतु, तसे न झाल्याने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सध्या शहरात सकाळी 7 ते 4 या वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी आहे. परंतु, प्रत्यक्षात दुकाने 10 वाजता उघडली जातात व दुपारी 4 वाजता बंद केली जातात. म्हणजे फक्त 6 तासच व्यापारी व्यवसाय करतात. पूर्वी 9 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी होती. सध्या वेळ कमी असल्याने व्यापाऱ्यांचे व्यवसाय होत नाहीत. त्यांना कर्मचाऱ्यांचे वेतन, दुकानाचे भाडे व इतर खर्च भागविणे कठीण झाले आहे. मागील एक वर्षापासून सर्व उद्योग व्यवसाय डबघाईला आले आहेत. सध्या शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशावेळी “जैसे थे” चा आदेश हा व्यापारी व त्यावर विसंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. तरी शहरातील व्यापारी व ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने दुकानाची वेळ सकाळी दहा ते रात्री आठ अशी करावी, व निर्बंध शिथील करावेत अशी मागणी केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.