Chinchwad News : गिरीश प्रभुणे यांच्या समर्पित कार्याचे पद्मश्री पुरस्कारामुळे चीज – अरुंधती प्रभुणे

एमपीसी न्यूज : पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालेले चिंचवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या पत्नी अरुंधती प्रभुणे यांची एमपीसी न्यूजच्या प्रतिनिधी दिव्या भंडारे यांनी घेतलेली विशेष मुलाखत…

प्रश्न: अरुंधती काकू तुम्ही प्रभुणे काकांचा आज पर्यंतचा प्रवास जवळून बघितला आहेकाय सांगाल या प्रवासाविषयीकशी झाली सुरूवात?

उत्तर: आमचे लग्न झाले तेंव्हा मी 19 वर्षांची आणि प्रभुणे 24 वर्षांचे होते. त्यामुळे मी त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने जवळून बघितला आहे. प्रभुणे यांना खरेतर लहानपणापासूनच सामाजिक कार्य करण्याची आवड होती. ते संघाच्या शाखेत जायचे. तेंव्हापासूनच समाजासाठी काहीतरी करावे, असे त्यांना वाटायचे. त्यांना लिखाणाची, बौद्धिक ऐकण्याची, वेगवेगळी माहिती घेण्याची लहानपणापासूनच आवड होती.

आठवीमध्ये असताना त्यांनी कादंबरीदेखील लिहली. पुढे कॉलेजमध्ये त्यांच्या या समाजकार्य करण्याच्या गुणांना वाव मिळाला. परंतु त्यांची खरी सुरवात ही ग्रामयानापासून झाली. यमगरवाडीत तिथल्या लोकांबरोबर 15 -15 दिवस राहणे, शेती प्रकल्प बघणे, त्यांच्या समस्या सोडवणे यातून त्यांची सुरवात झाली. त्यांनी ब-याच ठिकाणी नोक-यादेखील केल्या. विवेक, माणूस अशा मासिकांमध्ये काम केले.

आमची प्रिंटींग प्रेसही होती. पण सामाजिक कार्य करण्याची असलेली आतून जी आवड होती, ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांच्या आवडीमुळेच आज गुरुकुल उभे राहिले आणि पारधी समाजाला समाजात एक स्थान मिळाले. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

प्रश्न: दलित, पारधी समाजांवर लक्ष केंद्रीत करावं, असं का वाटलं?

उत्तर: त्यांच्या सामाजिक कार्याची सुरवात ही ग्रामयानापासून झाली. हा समाज जगत असलेलं जीवन त्यांनी जवळून बघितलं आहे. त्यामुळे यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं, हे प्रभुणे यांना महत्त्वाचे वाटले. त्यामुळे संघामार्फतच त्यांनी तुळजापूरजवळील यमगरवाडी येथे दलित, भटक्या समाजातील लहान मुलांच्या शाळेचा प्रकल्प सुरू केला. दुसरं म्हणजे लहानपणी एकदा घरी येताना त्यांनी पारधी पालांचं जीणं कसं असतं हे पाहिलं होतं.

त्यामुळे पारधी लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावं, असं त्यांना वाटलं कारण पारधी समाजातील लहान मुलांचे आई-वडिल चो-यामा-या करायचे आणि मुलं नुसती राना-वनांत हिंडायची. त्यामुळे पारधी म्हणजे चोरी करणारा, असे समीकरणंच होऊन गेलेलं. म्हणून हा पारधी लोकांवर प्रकल्प करायचे ठरले. यासाठी एका गृहस्थांनी आम्हाला या प्रकल्पासाठी जागा दिली आणि प्रकल्प सुरू झाला.

स्थानिक आणि शहरांतून कार्यकर्ते मदत करायला जायचे. ज्ञानप्रबोधिनी, स्वरूपवर्धिनी अशा संघटनांनी आम्हाला मदत केली. कारण देणगी मिळवणं, हे सर्वात महत्वाचं काम होतं. देणगी मिळवण्यासाठी प्रभुणे व्याख्याने करत सगळीकडे हिंडायचे. मग कुठे धान्याच्या, कपड्यांच्या, पुस्तकांच्या अशा स्वरुपात देणग्या मिळायच्या.

दर महाशिवरात्रीला आम्ही हा प्रकल्प वाढावा यासाठी तिथे मेळावा भरवायचो. आणि असं करत करत शेवटी सरकारने ह्या आमच्या शाळेला मान्यता दिली.

प्रश्न: सध्या गुरुकुलमध्ये कोणकोणते उपक्रम होतात?

उत्तर: चापेकर वाड्याचा जिर्णोद्धार करून सुरू केलेलं हे गुरुकुल आहे. 5-8 मुलांपासून सुरू झालेली ही मुलांची संख्या सद्ध्या 450 आहे. बालवाडी ते बारावीपर्यंतच्या मुलांना आपण इथे घेतो. आणि 30-35 च्या आसपास आमचा स्टाफ आहे. याचबरोबर आम्ही गौशाळा सुरू केली असून त्यात 100 गाई आहेत. या गाईच्या दुधाची आम्ही कोठेही विक्री करत नाही. मुलांसाठीच वापरतो. मग नंतर हे दूध उरायला लागले. मग त्याचे दही, तूप, असे आम्ही करतो. पण हेदेखील फक्त मुलांसाठीच वापरतो. मुलांसाठी सुरू केलेलं आणि मुलांसाठीच वापरण्यात येणारं!

गुरुकुलमधील शिक्षण हे फक्त शालेय शिक्षण नसून व्यवहारी जगात मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहता येईल, असे शिक्षण असते. आमच्या येथील बरीच मुलं बाहेर पडून वकील, शिक्षक झाले. मुलांचे कल लक्षात घेऊन त्याप्रमाणे आम्ही त्यांना सुट्टीत प्रशिक्षण देतो. जसे की मूर्ती बनवायला शिकवतो, पणत्या बनवणे, इत्यादी.,याचा हेतू हाच की ही मुले स्वत:च्या पायावर उभे राहून स्वत:चा उदरनिर्वाह करतील आणि चोरीकडे वळणार नाहीत.

उदाहरण द्यायचे झाल्यास, या मुलांच्या आई-वडिलांनी कधी भेटायला आल्यावर चोरीच्या वस्तू मुलांना दिल्या तर मुले त्या वस्तू जाळून टाकतात आणि त्यांना सांगतात, “काकांनी चोरीचं काही घ्यायचं नाही, असं सांगितलयं”. अशाप्रकारे त्यांच्यात बदल घडत गेला.

सगळे सणवार, सगळ्या पद्धती, संस्कृत श्लोकांचे पठण, उत्कृष्ट मूर्तीकाम, चित्रकला, गृहविज्ञान अशा नानाविध गोष्टी आज आमची गुरुकुलमधील मुलं करत आहेत.

त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आपण वार्षिक स्नेहसंमेलने घेतो. ह्या मुलांकडून आपण एक पैसाही घेत नाही. यासाठी प्रभुणे स्व:त ठिकठिकाणी फिरायचे, व्याख्यानांमध्ये गुरुकुलचा प्रकल्प मांडायचे आणि लोकांना देणगी देण्याचे आवाहन करायचे. अशा प्रयत्नातून आजचे गुरूकुल उभे राहिलं आहे.

प्रश्न: लॉकडाऊनमध्ये काय स्थिती होती गुरुकुलमधील?

उत्तर: लॉकडाऊनमध्ये आपण ज्या मुलांना घरं आहेत, त्यांना घरी पाठवले. आपल्या गुरुकुलला सरकारची मान्यता मिळाली आहे, पण अनुदान अजून मिळत नाहीये. धान्य मात्र येतं. हे धान्य आम्ही त्यांच्या घरापर्यंत कसं पोहोचते करता येईल, याची व्यवस्था करतो.

प्रश्न: गुरुकुलमधील मुलांबद्द्ल, त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगाल?

उत्तर: आमच्या इथे असे विद्यार्थी आहेत, की जे घरी गेले तरी त्यांना घरी राहयचं नसतं, त्यांना गुरुकुलमध्ये परत यायचं असतं. पालक मुली जरा मोठ्या झाल्या की त्यांचे लग्न उरकून टाकतात. मग त्यांच्या पालकांनादेखील समजून सांगावे लागते. आणि तरी त्यांनी मुलींची लग्नं लावली आणि पुढे काही समस्या आली, तर ती मुलगी परत आमच्याकडे येतेच. मग त्यांना आम्ही काहीतरी काम देऊन आर्थिक मदत करतो. मुंबई, लातूर, अशा वेगवेगळ्या भागांतील भटक्या-विमुक्त समाजातील मुले गुरुकुलमध्ये आहेत. शिकण्याची तयारी, इच्छा असलेली ही मुलं आहेत. त्यामुळे आमचा दहावी-बारावीचा निकालही चांगला लागला आहे.

नुसतं शिकणंच नव्हे तर त्यांना विविध वनौषधींची माहिती असते, शारिरीक कसरतींची कामे करायला ते पहिले पुढे असतात. त्यांच्यात असे विविध गुण असतात, त्यांना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

ही मुलं त्यांच्या गावातील इतर मुलांच्या संपर्कात असतात. तेथील मुलांना इकडे येण्यासाठीही प्रोत्साहन देत असतात. इथे वेगवेगळे उपक्रम आपण घेत असतो आणि ज्यांना आवड आहे ती मुले ते पुढेदेखील करतात. मुलींना गृहविज्ञानदेखील शिकवतो. जेणेकरून पुढे त्या चटणी, मसाले यांचा व्यवसाय करू शकतील. गोव्यावरून आलेल्या एका मुलीने मी आजारी असताना, मला प्रचंड मदत केली व माझी सेवा केली. इतकी मायाळू मुलं आहेत ही.

प्रश्न: प्रभुणे सर सामाजिक कार्यानिमित्त बाहेरगावीसायचेतेंव्हा तुम्ही घर कशा पद्धतीने सांभाळले?

उत्तर: प्रभुणे यांच्या सामाजिक कार्याला जेंव्हा जोमाने सुरवात झाली, तेंव्हा आमची मुले लहान होती. घरात सासू-सासरे आणि माझ्या आजेसासूही होत्या. पण माझा दृष्टीकोन असा होता की, आपण चांगल्या कामासाठी कधीच अडवायचं नाही. ते चांगलं काम करत आहेत ना मग हरकत नाही! आणि त्यांनी मला त्यांना असलेल्या सामाजिक आवडीबद्दल तशी कल्पना दिली होती. मला हवं असेल तेंव्हा मी नोकरी करेन, नाही वाटलं तर नाही करणार. सामाजिक कार्य हीच माझी आवड आहे. याला माझीही परवानगी होती. आम्ही दोघांनीही ठरवलेलं होतं मी नोकरी करून घर सांभाळेन आणि प्रभुणे नोकरी आणि सामाजिक कार्य दोन्ही गोष्टी बघतील.

आम्ही दोघांनी आमच्या भूमिका कुरबुर न करता पार पाडल्या. एकदा एखादी  गोष्ट करायची ठरवली तर मग येणा-या अडचणींवर मात करायला शिकले पाहिजे. त्याची कटकट करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे भांडणं आमच्यातही झाली…पण आम्ही त्यातून मार्ग काढत पुढे आलो आहोत..

प्रश्न: या प्रवासातील एखादा न विसरता येणारा असा कोणता किस्सा सांगाल?

उत्तर: असे बरेच किस्से घडलेत…सगळेच नवीन आणि वेगळे होते. या घटनांतून आम्हाला खूप शिकायले मिळाले. पण त्यातूनही एक किस्सा सांगायचा झाला तर एकदा एक पेट्रोल पंप लुटला गेला आणि तिथे मारामारी झाली. त्या मारामारीत त्या मुलीचे आई-वडिल गेले. ती मुलगी म्हणजे तान्हं बाळ. पंपाशेजारीच एक झोपडी होती. या झोपडीतील वृद्ध दांपत्याने तिला काही दिवस सांभाळले.

पण त्यांच्या मुलाचे लग्न झाले आणि त्याची बायको काही त्या बाळाला सांभाळेना. मग त्यांनी त्या मुलीला आपल्याकडे दिले. आता त्या बाळाचं काही नाव वगैरे काही माहीत नाही. मग तिची फाईल बनवली. या मुलीला आम्ही गार्गी आणि चापेकरांचे तिसरे बंधू, ज्यांना मूल-बाळ नाहीये, त्यांचं नाव दिलं.

गार्गी वासुदेवराव चापेकर! त्या मुलीला आपण वाढवलं. ती सतत घरी यायची, मी ही तिचं करायचे. ती आजारी पडली की काकांकडे हट्ट करायची, “की मला काकूंकडे जाऊ दे”. आणि माझ्याकडे इथे घरी येऊन राहायची. आमच्या घरातला कोणताही कार्यक्रम असू दे, आम्ही तिला बरोबर घेऊन जायचो. आमची कन्याच! उद्या तिचं लग्न करायची वेळ आली तरी आम्ही आहोतच तिच्याबरोबर. माझ्या मैत्रिणीही तिला त्यांच्याबरोबर घेऊन जातात. अनेक घटनांनी युक्त असलेला असा हा प्रवास आहे.

प्रश्न: या प्रवासाकडे मागे वळून बघताना काय वाटत आहे?

उत्तर: खूप मोठा प्रवास आहे हा..अनेक जणांचे हात प्रकल्पाला लागले आहेत. आणि पुरस्कार मिळाल्याने आम्हा सर्वांनाच आनंद झाला आहे. चांगले, वाईट असे विविध अनुभव यांत आले. मुलांची माया बघायला मिळाली. प्रभुणे यांनी अक्षरश: या कार्यात स्वत:ला वाहून घेतलं आहे. त्यांच्यामुळे आम्हालादेखील ह्या प्रवासाचे साक्षीदार होता आले.

प्रभुणे यांनी ह्यासाठी अफाट कष्ट केले आहेत. त्यामुळेच लोकांचा पारध्यांकडे बघायचा दृष्टीकोन बदलला आहे. पोलिसांकडून होणारी धरपकड कमी झाली आहे. आणि मुलांना कुटुंबव्यवस्था म्हणजे काय, हे उमगले, अनुभवता आले. त्यांना एक सामाजिक स्थान मिळाले. त्यामुळे प्रभुणे यांच्या कामाचे चीज झालं आहे. पुढेही असचं जोमाने आमचं काम सुरू राहणार आहे.

शहरातल्या आणि गावातल्या अशा विविध लोकांनी आम्हाला खूप मदत केली आहे. आपापल्या परीने लोकं खूप देतात.  घरात कसं आपलं कुटुंब असतं तसच हे! फक्त घरातले आपले छोटे कुटुंब आणि गुरुकुल हे आमचे मोठे कुटुंब आहे. चांगले वाईट दोन्ही अनुभवांनी युक्त असं हे आहे. या कुटुंबात आम्ही काही नियम पाळतो. एक म्हणजे जे मुलांसाठी आहे ते त्यांच्यासाठीच ठेवायचं. घरी काहीही आणायचं नाही. दुसरं म्हणजे प्रभुणे यांना देखील कधी पुरस्काराच्या रुपात चेक किंवा देणगी वैयक्तिक मिळाली तरी आम्ही ती मुलांसाठीच वापरतो. कारण गुरुकुलला त्याची आवश्यकता आहे, घराला नाही! शेवटी आपणही समाजाचे काही देणं लागतोच ना!

प्रश्न: सामाजिक कार्यामुळे काकांचा घराला सहवास कमी लाभला. काय सांगाल याविषयी ?

उत्तर: हो, हे मात्र आहे. प्रभुणे कामानिमित्त कधी 15 दिवस, कधी 1-2 महिने बाहेर असायचे. महिन्यांतून घरी एखाद-दुसरी चक्कर असायची. मुलं तशी लहानच होती. मनस्विनी आणि मुकेश तसे मोठे होते. पण धाकट्या मयुरेशला मात्र ते जाणवायचं. पण मुलांना मी समजावलं होतं, तुमचे वडील सामाजिक कार्यात आहेत आणि मी शिक्षिका आहे.

आता तुम्ही ठरवा तुम्हाला कसं वागायचे आहे ते. सुरुवातीला मुलांना पण ही अडचण वाटायची. पण नंतर त्यांना हे जाणवू लागलं की, आपल्याला हे सगळं मिळतयं, त्यांना काही मिळत नाही. असा हळूहळू आमचा दृष्टीकोन बदलत गेला.

माझी मुलगी मनस्विनी ही पत्रकार असून ती लवकर नोकरीला लागली. मुलगा मुकेश चित्रकलेत आणि मयुरेश हा खगोलशास्त्रामध्ये आहे.

सुरवातीला मलाही वाटायचं प्रभुणे यांनी नोकरी करावी. माझ्या माहेरचे मला म्हणायचे, “काय गं तुझा नवरा सारखा लष्कराच्या भाक-या भाजत असतो”. पण मी सगळ्यांना म्हणायचे त्यांना याची आवड आहे. माझा भाऊ मग माझी बाजू घेऊन म्हणायचा, की “त्यांना आवडतं ते काम ते करत आहेत आणि याची अरुंधती कोणतीही तक्रार आपल्याकडे करत नाही ना… मग आपण यांवर बोलायचा काही संबंधच नाही.

जेंव्हा ती तक्रार करेल, तेंव्हा आपण यावर बोलू”. खरं सांगायचे तर मलाही टिपिकल चौकोनी असा संसार कधीच करायचा नव्हता. काहीतरी वेगळं करायचे, हेच डोक्यात होते. म्हणून मी त्यांना कधी विरोध केला नाही.

ब-याचदा प्रभुणे घरी यायच्या आधी मला फोन करून सांगायचे, “माझ्या बरोबर 10-12 माणसं आहेत, त्यांना पण जेवायला करावे लागेल”. मग मी मोठी पातेली काढायचे आणि 10-12 माणसांचा स्वयंपाक करायचे. पण मला यांत “काय हा व्याप आहे किंवा कटकट आहे”, असे कधीच वाटले नाही. घरच्या सणांनाही प्रभुणे यांची उपस्थिती नसायची.

आमच्याकडे दोन नवरात्र असतात. ते मला म्हणायचे “तू तळी आरती घे करून मी येतो मागून दर्शनाला”. मग ते नंतर यायचे आणि दर्शन घेऊन जायचे. आम्हाला याची आता सवय झाली आहे. पुरुष जर घरात नसेल तर सगळे निर्णय हे बाईलाच घ्यावे लागतात. अशा बाहेरच्या आणि घरच्या विविध जबाबदा-या मला एकटीने पार पाडाव्या लागल्या.

त्यामुळे मला अखंड नोकरी करावी लागली आणि घरचंदेखील पाहावे लागले. प्रभुणे यांना घरचं काही पाहावे लागले नाही.

तुमच्या पुढील कामासाठी तुम्हाला शुभेच्छा काकू

धन्यवाद. आमचे काम असेच पुढे जोमाने चालू राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.