Pimpri: शहरातील मालमत्तांचा कर माफ करा; मराठवाडा जनविकास संघाची मागणी

Exempt City Property Tax demands Marathwada Janvikas Sangh.

एमपीसी न्यूज – जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्याने नागरिकांकडे पैसेच नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्तांचा कर महापालिकेने माफ करावा, अशी मागणी मराठवाडा जनविकास संघाने केली आहे.

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते.

पवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाने जगभर थैमान घातले असून, भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय, कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे.

लोकांच्या हाताला काम नसल्याने लोक हवालदिल झाले आहेत. पैसाच हातात नसल्याने घर कसे चालवायचे याची भ्रांत सध्या नागरिकांना पडली आहे. त्यामुळे मालमत्ताकर भरण्यासाठी त्यांच्यामागे तगादा लावणे उचित होणार नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव व संचारबंदी यामुळे नागरिकांचे जीवनमान ठप्प झालेले आहे. उत्पन्नाचे स्त्रोत व आर्थिक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महापालिकेने मालमत्ता कर घेऊ नये. शहरातील सर्व मालमत्तांचा सरसकट कर माफ करावा, अशी विनंती पवार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.