Pimpri: रखडलेले प्रश्न सुटतील का? शहरवासियांची ‘सीएम’कडून अपेक्षा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, पवना बंदीस्त जलवाहिनी प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, महापालिकेचा आकृती बंद असे विविध प्रश्न रखडले आहेत. गेल्या चार वर्षांपासून या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी उद्या (शनिवारी)शहरात येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरातील हे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत पुढाकार घेतील. ठोस आश्वासन देतील असा आशावाद शहरवासियांकडून व्यक्त केला जात आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न राज्यभर गाजला होता. त्यानंतर राज्य सरकारने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. परंतु, नियमावलीतील अटी-शर्थी जाचक आहेत. दंडाची रक्कम अधिक आहे. त्यामुळे घरे नियमित करण्यासाठी नागरिकांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळाला. शास्तीकराचा प्रश्न देखील जैसे-थेच आहे. चिंचवड येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकराच्या दंडाची रक्कम महापालिका ठरवेल, असे जाहीर केले होते. तथापि, त्याबाबत पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत.

पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याच्या प्रकल्पावरील बंदी अद्यापही उठली नाही. त्यामुळे गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून तो प्रकल्प रखडला आहे. आंद्रा-भामा, आसखडे धरणातून पाणी देण्याच्या मोबदल्यात सिंचन पुर्नस्थापना खर्च माफ करण्याची मागणी केली जात आहे. शहरातून वाहणा-या इंद्रायणी, पवना नदीचा सुधार प्रकल्प देखील रखडला आहे. महापालिकेचा आकृती बंद देखील नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला देखील शुभारंभ झाला नाही.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्टपासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले आहे. पंरतु, मनुष्यबळाची कमतरता, सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे हे प्रश्न मार्गी लागतील. या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठोस निर्णय घेतील, अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.