Pimpri News : साफसफाई साहित्यासाठी पाऊणकोटीचा खर्च?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी आवश्यक विविध प्रकारचे साफसफाई साहित्य खरेदी करण्यात येणार आहे, त्यासाठी पाऊणकोटीचा खर्च होणार आहे.

महापालिका आरोग्य मुख्य कार्यालयाने 29 सप्टेंबर 2020 रोजीच्या पत्राद्वारे सन 2020-21 करिता आवश्यक विविध प्रकारचे साफसफाई साहित्य खरेदी करून मिळावे, अशी मागणी मध्यवर्ती भांडार विभागाकडे केली आहे. त्यासाठी अंदाजपत्रकीय दर प्राप्त करून घेण्यासाठी दरपत्रके मागविण्यात आली.

साहित्य खरेदीसाठी वस्तु व सेवा समितीची मान्यता घेण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये एकूण 48 बाबींपैकी 36 बाबींची खरेदी करण्यास आणि त्यांच्या अंदाजपत्रकीय दरास मान्यता देण्यात आली आहे.

हे साहित्य खरेदीसाठी 73 लाख 5 हजार रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. सन 2021-22 करिता मध्यवर्ती भांडार विभागाकडे ‘जंतुनाशक, किटकनाशक, साफसफाई साहित्य व मशिन खरेदी’ या लेखाशिर्षावर पाच कोटी इतकी अंदाजपत्रकीय तरतुद आहे.

त्यामधून 2 कोटी 17 लाख 36 हजार रूपये खर्च झाला आहे. उर्वरीत 2 कोटी 82 लाख 63 हजार रूपयांमधून हा खर्च भागविणे शक्य आहे. त्यानुसार, या साहित्य खरेदीसाठी ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.