‘Baap Pandurang’ rap song : घरबसल्या वारी अनुभवा ‘बाप पांडुरंग’ रॅप साॅंगमधून

एमपीसी न्यूज : रॅप सॉंग म्हटलं की तरुणाईचे लगेच लक्ष वेधले जाते. अशाच एका रॅप सॉंगची सध्या धूम आहे, ते म्हणजे  ‘खास रे टीव्ही’च्या विठ्ठलावर तयार केलेल्या ‘बाप पांडुरंग’  या गाण्याची. वैशिष्ट्यपूर्ण आणि विठ्ठलावर तयार केलेल्या या पहिल्या रॅप सॉंगची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ‘बाप पांडुरंग’ या रॅप सॉंगमध्ये विठ्ठल व वारकरी यांचे असलेले नाते यावर भाष्य केलेले आहे.

 

‘खास रे टीव्ही’ नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. ‘ट्रम्प तात्या’ यांच्यापासून सुरु झालेला हा प्रवास ‘पाब्लोशेठ’, ‘बायडेन बापू’ , ‘एलोन मस्क’, ‘थेट भेट’ या बरोबरच “चहा प्या”, “गावरान मुंडे” आणि “उसाचा रस” या सारख्या नाविन्यपूर्ण गाण्यांपर्यंत अव्याहत सुरु आहे. यातील “उसाचा रस” हे गाणे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट देखील केले होते.

 

अशाच एका प्रयोगातून त्यांनी ‘बाप पांडुरंग’ हे रॅप सॉंग बनवले आहे. विठ्ठल व वारकरी यावर बनवलेले हे पहिलेच रॅप सॉंग आहे. हे रॅप सॉंग  निरंजन पेडगावकर (निरू), संजा, वैभव चव्हाण, रॉकसन यांनी लिहिले, गायले आहे. या तिघांसह सुमारे ४० ते ५० कलाकार घेऊन चित्रित करण्यात आलेल्या आणि घर बसल्या वारीचा आनंद देणाऱ्या या रॅप सॉंगचे  दिग्दर्शन विशाल सांगळे व संजा यांनी केले आहे, या गाण्याचे संगीत दिग्दर्शन निरंजन पेडगावकर (निरु) यांनी केले आहे. हे रॅप सॉंग बनवताना टीमला शिवशंभो भजनी मंडळाचे (घिसरेवाडी) मोठे सहकार्य लाभले आहे. हे गाणं बोपदेव घाट, भिवरी गाव व पुण्यातील विविध ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे.

 

या गाण्याविषयी बोलताना निर्माते नरेंद्र फिरोदिया म्हणाले “आषाढी वारीचे आपल्या महाराष्ट्रात खूप महत्वाचे स्थान आहे. कोरोनामुळे मागील वर्षी वारी झाली नाही व यावर्षी देखील खूप कमी लोकांना वारीत जाण्याची परवानगी मिळाली आहे. ‘खास रे टीम’ने विठ्ठलावर केलेले रॅप साँग एक अनोखा प्रयोग आहे कारण हे नेहमीच्या पठडीतलं रॅप सॉंग नाही. ‘खास रे टीव्ही’ने सादर केलेले विविध प्रकारचे व्हिडीओज आणि गाणी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. या गाण्याद्वारे या टीमने विठ्ठलाचे एक नवे रूप आपल्यासमोर सादर केले आहे. या गाण्याने लोकांना विठ्ठल दर्शनाची अनुभूती होईल आणि ‘बाप पांडुरंग’ हे गाणं सर्वांना नक्की आवडेल असं मला वाटतं.”

 

‘बाप पांडुरंग’ गाणं पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.