Pune : मैफलीतून उलगडला डॉ. सरोजिनी बाबर यांचा लोकसाहित्याचा समृद्ध खजिना

ओव्या, भोंडला, गोंधळ, जोगवा अशा वेगळ्या गीतांचे सादरीकरण; मैत्रीण महिला विकास फौंडेशनतर्फे चारचौघी प्रस्तुत शब्द स्वरांचा लोक जागर… सरोजिनी बाबर (पुष्प २ रे) कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – ओव्या, भोंडला, हादग्याची गाणी, गोंधळ, जोगवा, बारश्याची गाणी, अभंग, लावणी, भारुड अशा लोकसंगीताच्या विविध प्रकारांमधून लोकगीतांचा अनोखा बाज असलेली एक आगळी-वेगळी मैफल रसिकांनी अनुभवली. मैफलीतून मराठी लोकसाहित्याच्या संकलक, संपादक आणि अभ्यासक असलेल्या दिवंगत लेखिका डॉ. सरोजिनी बाबर यांचा लोकसाहित्याचा समृद्ध ठेवा रसिकांसमोर उलगडला. गीत, संगीत, गप्पा आणि अभिवाचन अशा बहुरंगी मैफलीतून डॉ. सरोजिनी बाबर यांचा लोकसंगीताचा साहित्यिक प्रवास रसिकांनी अनुभवला. 

मैत्रीण महिला विकास फौंडेशनतर्फे मराठी लोकसाहित्याच्या संकलक, संपादक आणि अभ्यासक दिवंगत लेखिका डॉ. सरोजिनी बाबर यांच्या लोकसाहित्यावर आधारित चारचौघी प्रस्तुत शब्द स्वरांचा लोक जागर… सरोजिनी बाबर (पुष्प २ रे) या  कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात करण्यात आले होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सरोजिनी बाबर यांच्या भगिनी कुमुदिनी पवार, उर्मिला कराड, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, पार्वती चव्हाण, किशोर सरपोतदार, गणेश चव्हाण, डॉ. संगमनेरकर, अर्चना नार्वेकर, प्रमोद वाघमारे, मैत्रीण महिला विकास फौंडेशनच्या संध्या गायकवाड उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पयल नमन करितो वंदन… या गणाने झाली. यानंतर सुंदर माझे जाते गं… या जात्यावरच्या ओवीचे सौंदर्य रसिकांना उमगले. दशरथाच्या दरबारी सोनियाचा पाळणा… या पाळण्याने बारश्याचा सोहळा रसिकांसमोर उभा राहिला. रानातल्या बोरी… शेतकरी गीत… ओव्या… अशा लोकसंगीताचा अमूल्य ठेवा रसिकांपुढे सादर झाला. ऐलोमा पैलोमा… कारल्याचे बी… सासरच्या वाटे कुचुकुचु काटे… या हादग्याच्या गीतांना लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.

चंद्रभागेच्या तिरी… या अभंगाने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. अंबाई जोगाई गं… या जोगव्याच्या तर नवसाला पावली ग आई… या गोंधळाच्या तालावर रसिकांनी ठेका धरला. आली आली हो भागाबाई… या भारुडाच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. गवळण… लावणी… नाट्यगीत अशा विविध गीतप्रकारांनी कार्यक्रमात बहार आणली.

कुमुदिनी पवार म्हणाल्या, खेड्यातील जनमानसाचा देखणा बाज समाजापुढे अविष्कृत करणारी अशी माझी मोठी बहिण डॉ. सरोजिनी बाबर. शिक्षणाची फारशी ओढ नसलेल्या कुटुंबात अक्कांचा जन्म झाला. त्या काळी घरातल्या मुली बाहेर पडत नसत अशा काळात डॉ. सरोजिनी बाबर म्हणजेच अक्कांनी शिक्षण पूर्ण केले. पिचडी आणि डिलीट पदवी देखील मिळवली. असे सांगत बाळासाहेब ठाकरे तसेच इतर मान्यवर व्यक्तींच्या देखील आठवणी सांगितल्या

डॉ.सदानंद मोरे म्हणाले, सरोजिनी अक्कांचा हा कार्यक्रम सादर केला याबद्दल कौतुक. नव्या पिढीला लोकपरंपरा, लोकसाहित्य हे सांगायचे असेल आणि त्यांच्या माध्यमातून पुढे न्यायचे असेल. तर त्यांच्यासाठी चांगला कार्यक्रम. लोकसंगीताचा बाज अशा स्वरुपाच्या कार्यक्रमातूनच पुढे गेला पाहिजे.

कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना विद्या नितीन यांची होती. शिल्पा देशपांडे, रत्ना दहिवेलकर, केतकी देशपांडे, विद्या नितीन, प्रा. रवींद्र शाळू, अनघा धायगुडे यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. मकरंद पंडीत (हार्मोनियम), अक्षय पाटणकर (तबला), नरेंद्र काळे (तालवाद्ये) यांनी साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.