Express Way News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – कारवर कागदांचे रीळ पडल्यामुळे कार पूर्णपणे चपटी झाली. यामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 27) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झाला.

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून एक ट्रक कागदांचे रीळ भरून जात होता. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रकमधील रीळ मागच्या बाजूला खाली पडले. दरम्यान ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला.

ट्रकमधील रीळ मागून येणाऱ्या एका कारवर पडले. अवजड रीळ कारवर पडल्याने कार शब्दशः चपटी झाली. या अपघातात कारमधील चालकाचा जागीच मृत्यू झाला. खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या अपघातामुळे द्रुतगती मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. मात्र पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली असून ट्रक आणि कार बाजूला घेण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.