Pune : शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवा – राजेश येनपुरे

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना महापालिकेकडून दिल्या जाणा-या शिष्यवृत्तीचा
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ३० नोव्हेंबरला संपली आहे. पण, शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही. त्यामुळे या योजनेस अर्ज करण्याची मूदत वाढवण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक राजेश येनपुरे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.

शहरातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना महापालिकेकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजने (शिष्यवृत्ती) अंतर्गत अनुक्रमे 15 आणि 25 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मूदत ३० नोव्हेंबरला संपली आहे.

मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही. शिवाय ऑनलाईन अर्ज भरलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत अद्याप महापालिका प्रशासनाकडे जमा केलेली नाही. यामुळे हजारो विद्यार्थी पात्र असूनही शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या योजनेस अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक येनपूरे यांनी महापौरांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.