Chinchwad News : कोविड रूग्णालयाचे कामकाज पाहणा-या ‘स्पर्श’ला मुदतवाढ

सव्वातीन कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे उभारण्यात आलेल्या 200 खाटांच्या कोविड रूग्णालयात 50 आयसीयू बेड आणि 150  ऑक्सिजन युक्त बेडची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी स्पर्श रूग्णालयाला देण्यात आलेल्या कामकाजास आणखी तीन महिने मुदतवाढ दिली आहे. त्यासाठी सव्वातीन कोटी रूपये खर्च होणार आहे. या प्रस्तावास स्थायी समितीने विनाचर्चा मंजुरी दिली आहे.

चिंचवड – ऑटो क्लस्टर येथे 200 खाटांचे कोविड रूग्णालय उभारले आहे. या रूग्णालयात अतिदक्षता विभागात (आयसीयू) 50 बेड आणि 150 ऑक्सिजन युक्त बेड अशी सुविधा आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट नुसार निविदा मागविल्या.

त्यामध्ये स्पर्श रूग्णालयाने रूग्णालयाने 50 आयसीयू बेडकरिता प्रति बेड प्रति दिवस 6 हजार 450 रूपये तर 150  ऑक्सिजन युक्त बेडकरिता प्रति बेड प्रति दिवस 1 हजार 950 रूपये दर सादर केला. त्यांचे दर लघुत्तम असल्याने  तीन महिने म्हणजेच 90 दिवस कालावधीकरिता 5 कोटी 53 लाख 50  हजार रूपये या खर्चास स्थायी समिती सभेने 1 सप्टेंबर 2020  रोजी मान्यता दिली.

स्पर्श रूग्णालयाने 28 ऑगस्ट 2020 पासून कामाला सुरूवात केली आहे. त्यांचा तीन महिन्याचा कालावधी 27 नोव्हेंबर 2020 रोजी संपुष्टात आला आहे. त्यांना 27 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ आदेश देण्यात आला आहे. या तीन महिने कालावधीकरिता अंदाजे 3 कोटी 20 लाख 99 हजार रूपये खर्चास कार्योत्तर मान्यता घेण्यात येणार आहे.

कोरोना रूग्णालय सुरू झाल्यापासून दाखल झालेल्या रूग्णांना 180 रूपये प्रति रूग्ण याप्रमाणे जेवण देण्यास तसेच या ठिकाणी हाऊसकिपींग काम करण्यासाठी 24 हजार 77  रूपये प्रति कर्मचारी यानुसार 30 कर्मचारी उपलब्ध करण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे. हा खर्च मध्यवर्ती भांडार विभागाकडील कोरोना निधी या लेखाशिर्षामधून भागविण्यात येणार आहे.  या प्रस्तावास स्थायी समितीने विनाचर्चा मंजुरी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.