Vadgaon Maval : कुक्कुटपालन कंपन्यांकडून पोल्ट्री व्यावसायिकांची पिळवणूक

एमपीसी न्यूज : : मावळ तालुक्यातील काही कुक्कुटपालन कंपन्यांकडून पोल्ट्री व्यावसायिकांची पिळवणूक केली जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या असून कंपन्यांनी ही पिळवणूक त्वरित थांबवावी अशी मागणी विशेष सभेत करण्यात आली आहे. 

मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष सभा कान्हे फाटा येथे आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे गुरूजी हे होते. तर सभेस  एकनाथ गाडे, सचिन आवटे, गजानन खरमारे, सोमनाथ राक्षे, प्रविण शिंदे, विनायक बधाले, उत्तम शिंदे, हनुमंत बधाले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मावळ तालुक्यात गेली 17 – 18 वर्षे पोल्ट्री व्यवसाय सुरू असून एक हजाराच्या आसपास स्थानिक शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत यासाठी तालुक्यात सुमारे 15 कंपन्यां कार्यरत आहेत. त्या 15 कंपन्यांशी करार पद्धतीने शेतकरी हा व्यवसाय करीत आहे.

या सभेत सदस्यांनी कंपनीबाबत अनेक तक्रारी केलेल्या आहेत. मावळ तालुक्यात काही कंपन्यां शेतकऱ्यांना पक्षी वेळेवर देत नाहीत, त्यांना पुरेसे खाद्य व गुणवत्तापूर्ण खाद्यही दिले जात नाही. याशिवाय औषधेही वेळेवर पुरवली जात नाहीत त्यामुळेच पक्षाची वजने वाढत नाहीत. तसेच कंपनीच्या सुपरवायझर कडून शेतकऱ्यांला योग्य दर दिला जात नाही. अशा तक्रारी या सभेत सदस्यांनी केल्या.

सुमारे 18 ते 19 वर्षापूर्वी मावळ ॲग्रोचे संस्थापक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली असून काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांना छळण्याचे काम होत आहे. लवकरच शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे गोपाळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.