Chakan : पुणे ते भीमाशंकरसाठीही जादा बसेस

परिवहन मंत्री रावते यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले सहावे सह्याद्रीच्या कुशीतील ज्योतिर्लिग श्री क्षेत्र भीमाशंकर येथे यंदाच्या श्रावण महिन्यात दर्शनासाठी 15 लाख भाविक आल्याचा शासकीय आकडा आहे. परंतु भाविकांचा वाढता ओढा आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण आल्याची स्थिती समोर आली. त्याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्याच्या शिष्ट मंडळाने राज्याच्या परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन ही स्थिती समोर आणली. त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी भीमाशंकर देवस्थान ते भीमाशंकर वाहनतळ दरम्यान 5 मिनी बसेस सुरु करण्याचे व पुणे ते भीमाशंकरसाठीही जादा बसेस सुरु करण्याचे आश्वासन दिले.
मोठ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी ही भीमाशंकर देवस्थानची नित्याचीच समस्या झाली होती. यावर तोडगा म्हणून प्रशासनाने या वर्षी खाजगी बसेस चालवुन ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु पूर्ण यशस्वी झाला नसल्याने भाविकांची गैरसोय झाली होती. यावर तोडगा म्हणून शुक्रवारी (दि.५) खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्यासह शिष्ट मंडळाने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट घेतली.

_MPC_DIR_MPU_II

भाविकांच्या गैरसोयी बाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर या विषयावर तोडगा काढत भीमाशंकर देवस्थानचे वाहनतळ ( पार्किंग)  ते श्री. क्षेत्र भीमाशंकर देवस्थान साठी एस.टी. महामंडळ कायमस्वरूपी वाहने उपलब्ध देणार असल्याचे आश्वासन मंत्री रावते यांनी शिष्ट मंडळाला दिले. पुणे  ते श्री. क्षेत्र भीमाशंकर यासाठी देखील जादा बसेस सुरु करणार असल्याचे सांगितले. याबाबत आमदार सुरेश गोरे यांनी गेल्या महिन्याभरापासून पाठपुरावा केला होता. यामुळे भीमाशंकर येथे येणा-या भाविकांची मोठी सोय होणार आहे. मंत्री रावते यांच्या समवेत झालेल्या बैठकीसाठी सामाजिक कार्यकर्ते रामदास जाधव, नीलेश आंधळे, नीलेश गायकवाड, योगेश लंघे, अरुण मोटे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.