Pune News : पुण्याच्या रास्ता पेठेत भीषण आग, तीन फ्लॅट, दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील रस्ता पेठ परिसरात मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत तीन फ्लॅट आणि दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या आगीत एका चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या तब्बल 6 गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविले. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रास्ता पेठेतील अपोलो चित्रपटगृहाजवळील ओम साई अपार्टमेंट या इमारतीत ही आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मध्यरात्री अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तीन वाजून पंधरा मिनिटांनी ही आग नियंत्रणात आणली. तोपर्यंत या आगीत मोठे नुकसान झाले होते. तीन फ्लॅट आणि दोन दुकाने जळून खाक झाले होते.

दरम्यान आग लागलेल्या घरामध्ये असणारे गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.  मात्र आग नेमकी कुठल्या कारणाने लागली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बिल्डींगमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा असल्याने त्याचाही वापर सुरुवातीला करण्यात आला होता मात्र आगीचे स्वरूप मोठे असल्याने अग्नीशमन दलाला पाचारण करावे लागले. आगीत वॉचमनची केबीन, तेथेच पार्क केलेली एक कारही जळून खाक झाली. इमारतीच्या तळमजल्यावर एक स्पेअरपार्ट व दुसरे चप्पलचे दुकान आहे. या दुकानातून आगीला सुरुवात झाल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.