रविवार, सप्टेंबर 25, 2022

F.C. Road Crime : खाली पडलेल्या 90 रुपयांच्या आमिषापोटी 86 हजार गमावले

एमपीसी न्यूज – तुम्ही कारमध्ये बसला असाल आणि एखादी व्यक्ती तुमचे पैसे खाली पडले म्हणत पैशाचे आमिष दाखवत असेल तर सावधान…. कारण याच खाली पडलेल्या 50-100 रुपयांसाठी तुम्हाला लाखो रुपयांना लुटले जाऊ शकते. पुण्यात असाच प्रकार घडला असून कार चालकाला 80 ते 90 रुपयांचे आमिष दाखवले व कारमधले 86 हजार रुपयांचे सामान व रक्कम चोरून नेली. हा प्रकार पुण्यातील एफ.सी.रोडवर (F.C.Road Crime) बुधवारी (दि.10) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला.

याप्रकरणी विजय जगताप (वय 31, रा. ठाणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एफ.सी रोडवर त्यांच्या पार्क केलेल्या कारमध्ये बसले होते. त्यावेळी आरोपीमधील एकजण तेथे आला. त्याने फिर्यादी यांच्या कारच्या ग्लासवर टकटक केली. यावेळी फिर्यादी यांनी काच खाली केली असता त्याने तुमचे पैसे खाली पडले आहेत अशी मदत करण्याचा बहाना केला. फिर्यादी यांनी कारचा दरवाजा उघडत पैसे घेण्यासाठी खाली वाकले असता दुसऱ्या चोरट्याने कारमधील रोख 18 हजार रुपये, लॅपटॉप, दोन फिंगरप्रींट स्कॅनर बँकेचे कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण 86 हजार 600 रुपयांचा ऐवज (F.C.Road Crime) चोरून नेला.

एफ.सी.रोड सारख्या गजबजलेल्या ठिकाणी एखादी व्यक्ती भर दिवसा अशी लुट केल्याने तेथे चोरी करणारी एखादी टोळी सक्रीय तर झाली नसेल ना? अशी भिती सध्या व्यक्त केली जात आहे. याचा पुढिल तपास डेक्कन पोलीस करीत आहेत. तरी नागरिकांनी अशा भूल-थापांना व आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

spot_img
Latest news
Related news