Pimpri News : राष्ट्रवादीच्या एका पदाधिकारी महिलेचे फेसबुक हॅक, तर दुसरीला येताहेत अश्लील मेसेज

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकारी महिलेचे फेसबुक हॅक झाले असून त्यावरून अनेकांना अश्लील मेसेज पाठवले जात आहेत. तर दुस-या पदाधिकारी महिलेला अनेक नंबरवरून अश्लील मेसेज येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदनामीचा प्रकार सुरु असल्याचे संबंधित पदाधिकारी महिलांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीच्या एका राज्यस्तरीय पदाधिकारी महिलेचे 19 ऑक्टोबर रोजी फेसबुक हॅक झाले. त्यावरून पदाधिकारी महिलेच्या मैत्रिणी, नातेवाईक, पक्षातील पदाधिकारी महिलांना मेसेज करून त्रास दिला जात आहे. त्यांनी पोलिसांकडून फेसबुक अकाउंट सिक्युअर करून घेतले असता त्यानंतर देखील त्यांच्या अकाउंटवरून मेसेज करण्यात आला. याबाबत त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

राजकीय क्षेत्रात काम करताना अशा गोष्टींमुळे नाहक त्रास होत असल्याचे संबंधित पदाधिकारी महिलेने म्हटले आहे. आगामी महापालिका निवडणुकीला आपण इच्छुक असून हे समजल्यानंतर आठ दिवसांनी फेसबुक हॅक करण्याचा प्रकार घडल्याचे देखील पदाधिकारी महिलेने सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका दुसऱ्या पदाधिकारी महिलेला देखील अनेक नंबरवरून अश्लील मेसेज, व्हिडीओ, कॉल येत आहेत. सन 2017 ची महापालिका निवडणूक लढवली असून त्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आगामी निवडणुकीत आपण इच्छुक असल्याने आपल्याला जाणीवपूर्वक हा त्रास दिला जात असल्याचे संबंधित महिलेने सांगितले आहे. अशा प्रकारामुळे आपल्या जीवाला व कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याचा मानसिक त्रास होत असल्याचेही त्या महिलेने म्हटले आहे.

या संदर्भात वुमेन्स हेल्पलाईनच्या प्रदेशाध्यक्षा नीता परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्या संस्थेकडेही अशा प्रकारच्या तक्रारी अनेक महिलांकडून येत असल्याचे सांगितले. महिलांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्यावी. अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत. ठराविक कालावधीनंतर पासवर्ड बदलावेत. ग्रुपमध्ये फोन नंबर, फोटो शेअर करू नये. अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.