Talegaon News :  अँटीजेन चाचणीआधी पाॅझिटिव्ह रूग्णांवरील उपचारांसाठी सुविधा उपलब्ध करावी 

नागरिकांमध्ये भीती निर्माण होईल, अशा प्रकारचं नियोजन करू नका अशाप्रकारे  अनेक सूचना यावेळी उपस्थित नगरसेवकांनी प्रशासनास केल्या.

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे; परंतु ही चाचणी करण्यापूर्वी पाॅझिटिव्ह रूग्णांवर उपचार करण्यासाठीची सुविधा प्रथम  उपलब्ध करावी. अशी मागणी नगरपरिषदेतील सर्वपक्षीय नगरसेवकांकडून झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहात सोमवारी (दि. 14) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अशी माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या. यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, सभागृहनेते अमोल शेटे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, तळेगाव शहर सुधारणा समितीचे  गटनेते किशोर भेगडे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, नगरसेवक गणेश खांडगे, निखील भगत, अरुण माने, रवींद्र आवारे, सुरेश दाभाडे, नगरसेविका शोभा भेगडे, विभावरी दाभाडे, काजल गटे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे आदी नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्य शासन व जिल्हा शासन यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्टचा उपक्रम राबवण्यात येणार असल्याच्या माहितीवरून  पत्रकार परिषदेत ते रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्या अगोदर तळेगावमध्ये किती कोविड केंद्र  उपलब्ध आहेत. जर या टेस्टमध्ये मोठ्या संख्येने संक्रमित रुग्ण मिळाले तर त्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था काय केली आहे.   जर मोठ्या संख्येने रुग्ण उपलब्ध झाले अन त्यांची व्यवस्था आपणास करता आली नाही तर याला जबाबदार कोण? यासाठी येणाऱ्या खर्चाचे नियोजन केले आहे का? सर्वांना मोफत उपचार मिळणार का? व्हेंटिलेटर, आय सी यु बेड तयार केले आहेत का? याबाबत प्रशासनावर उपस्थितांनी प्रश्नाचा भडिमार केला.

अशा प्रकारच्या अनेक प्रश्नाबरोबर अगोदर जम्बो कोव्हिड सेंटर तयार करा, प्लाझ्मा थेरपी मशीन उपलब्ध करा.  यासाठी येणा-या खर्चाचे नियोजन करा. तसेच नागरिकांमध्ये भीती निर्माण होईल, अशा प्रकारचं नियोजन करू नका अशाप्रकारे  अनेक सूचना यावेळी उपस्थित नगरसेवकांनी प्रशासनास केल्या.
तसेच जोपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन मावळ मुळशीचे प्रांत संदेश शिर्के यांना नगराध्यक्षांच्या सहीसह पंचवीस नगरसेवकांनी दिल्याचे यावेळी सांगितले, यास सर्व उपस्थितांनी दुजोरा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.