Pune : लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीचा गळा आवळून प्रियकराने घेतला गळफास

शेजा-यांच्या वेळीत लक्षात आल्याने प्रेयसीचा जीव बचावला; प्रियकराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीचा गळा आवळून प्रियकराने गळफास घेतला. मात्र, शेजा-यांच्या वेळीच लक्षात आल्याने प्रेयसीचा जीव बचावला. तर आरोपी प्रियकर याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.27) आंबेगाव बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी एका 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राजराम पाटघर (वय 28, रा. आंबेगाव बुद्रूक) असे मयत प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम हा मूळ कर्नाटकचा रहिवासी असून तो आंबेगाव बुद्रुक येथे भाड्याने रूम घेऊन राहतो. गेली दोन वर्षे त्याचे एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र मुलीच्या घरच्यांना या लग्नाला विरोध होता. त्यामुळे मुलीने नंतर लग्न करायला नकार दिला.

प्रेयसीने नकार दिल्याने राजाराम याने त्याच्या रूमवर आपल्या प्रेयसीला शेवटचे एकदा भेटायला बोलावले. त्यानुसार प्रेयसी राजाराम याला भेटावयास आली होती. सुरुवातीला दोघांनीही काही वेळ सोबत घालवला. त्यानंतर राजाराम याने पुन्हा एकदा लग्नाचा हट्ट धरला. मात्र, प्रेयसीने लग्नाला नकार दिला.

याचा राग येऊन राजाराम याने घरातील नायलॉनच्या दोरीने गळा आवळला. गळा आवळल्याने ती बेशुद्ध झाली. मात्र, प्रेयसीचा मृत्यू झाला असे वाटल्याने राजाराम याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, प्रेयसीला पुन्हा थोडीफार शुद्ध आली. त्यावेळी ती जागेवरच विव्हळत होती. शेजा-यांना मुलीचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता राजाराम याने गळफास घेतल्याचे दिसले.

त्यांनी तातडीने खोलीत येऊन मुलीला नवले हॉस्पिटल येथे उपचारार्थ नेले आणि घटनेविषयी पोलिसांना कळविले. मुलगी बचावल्यानंतर आज शुक्रवारी तिचा जबाब नोंदवला. त्याप्रमाणे मयत राजाराम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.