Fair & Lovely Drops Word Fair: आता ‘फेअर अँड लव्हली’मधून ‘फेअर’ होणार हद्दपार

Fair & Lovely Drops Word Fair: Now 'Fair' will be banished from 'Fair and Lovely'

एमपीसी न्यूज- ‘हम काले है तो क्या हुआ, दिलवाले है’, असं कॉमेडियन मेहमूदला एका चित्रपटात गो-या हिरॉइनला पटवण्यासाठी म्हणावे लागले होते. आपल्या रोजच्या जीवनात पण हीच गोष्ट सत्य आहे. ‘गोरी बायको हवी’ अशी मागणी पूर्वापार चालत आलेली आहे. आपण भारतीय खरं तर सावळ्या वर्णाशी जास्त जवळचं नातं सांगतो. पण तरीदेखील आपल्या गो-या रंगाचे खूप आकर्षण असते.

सध्या जगभरात वर्णभेद संपवण्यासाठी मोहीम सुरु आहे. यातून धडा घेत हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने ‘फेअर अँड लव्हली’ नावातून ‘फेअर’ शब्द हटवण्याचे ठरवले आहे.

कंपनीने गुरुवारी याबाबत माहिती देत सांगितले की, नवे नाव सर्वांच्या मंजुरीनंतर जाहीर केले जाईल. कंपनी आता नव्याने लाँच केल्या जाणाऱ्या उत्पादनात वेगवेगळे त्वचा रंग असणाऱ्या महिलांच्या प्रतिनिधित्वावर जास्त लक्ष देईल. कंपनीच्या ४५ वर्षे जुन्या या ब्रँडची भारतात वार्षिक ३७५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल आहे.


काही दिवसांपूर्वी अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर जगभरात तसेच प्रामुख्याने अमेरिकेत कृष्णवर्णीयांसोबतच्या भेदभावाबाबत ‘ब्लॅक लाइव्ह मॅटर’ मोहीम सुरु आहे.

या वर्णद्वेषाच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हरने हे पाऊल उचलेले आहे. फेअर अँड लव्हलीचे स्कीन क्रीम भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. हिंदुस्थान युनिलिव्हरवर ते त्वचेच्या रंगाबाबत ते दुराग्रह निर्माण करत आहेत, असा आरोप होत आहे.

यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी सांगितले की, २०१९ मध्ये कंपनीने दोन चेहरे असलेले कॅमिओ हटवले होते.

भारताने नेहमीच वर्णभेदाच्या विरोधात लढा दिलेला आहे. तरीदेखील गो-या रंगाला अवास्तव महत्व दिले जाते हे सत्य आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीनी याविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे वरकरणी का होईना मनोरंजन क्षेत्रात रंगभेद नाही असा प्रचार केला जातो.

हिंदुस्थान युनिलिव्हरशिवाय जॉन्सन अँड जॉन्सन, ग्लोशियर, शादी डॉट कॉमसह यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनात वर्णभेदाला चालना देणारे फीचर हटवणे सुरु केले आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन देखील त्यांचे उत्पादन असलेली ‘बँडएड’ची स्किन कलरची पट्टी गडद काळी आणि तपकिरी करणार आहेत. शादी डॉट कॉमने त्यांच्या वेबसाइटवरुन त्वचेच्या रंगाच्या आधारे जोडीदार शोधण्याचा पर्याय हटवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.