Fairness Issue : सावळेपणावरुन टीका होण्यावर ‘या’ अभिनेत्रींनी व्यक्त केल्या भावना

Fairness Issue: Emotions expressed by 'this' actresses when criticized for being shadowy सोनाली कुलकर्णी बरोबरच अभिनेता अभय देओल, अभिनेत्री नंदिता दास, बिपाशा बसू यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. यातील नंदिता आणि बिपाशा या अभिनेत्रींनी त्यांच्या सावळ्या वर्णावरुन बरीच टीका सहन केली होती.

एमपीसी न्यूज – फेअर अँड लव्हलीची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हरने नावात बदल करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने रसिकांना मोहून टाकणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. आता आपण स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारु, असं म्हणत सोनालीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

फेअर अँड लव्हलीच्या या निर्णयाचे स्वागत करताना सोनाली म्हणाली, ‘आपण आशिया खंडात राहतो, आपण भारतात राहतो. आपल्या मातीशी, आपल्या हवामानाशी नातं सांगणारा आपला रंग, वर्ण आहे. आपणा सर्वांना विदेशी गोरेपणाचं प्रचंड आकर्षण असल्यामुळे गेली अनेक वर्षे आपण आपल्या रंगाला नाकारतो आहे. त्यामुळे असे वेगवेगळे प्रयोग स्वत:ला गोरं करण्यासाठी आपण करत आहोत. पण आता याला आळा बसेल आणि आपण स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारु’.

‘आपल्याला नेहमीच असं वाटतं की कलाकारांना त्यांच्या रंगाचा न्यूनगंड असेल. पण त्याहीपेक्षा सामान्य व्यक्तीला सुंदर असण्याचा, गोरं दिसण्याचा जो न्यूनगंड आहे तो आता फेअर हा शब्द काढून टाकल्याने नक्कीच कमी होईल अशी आशा आपण करूया’, असं ती पुढे म्हणाली.

गोरं होण्यासाठी या क्रीमचा वापर करा अशी जाहिरात करत असल्याने अनेक सेलिब्रिटींनी याची जाहिरात करण्यास नकारही दर्शवला होता. त्यामुळे अखेर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

सोनाली शिवाय अभिनेता अभय देओल, अभिनेत्री नंदिता दास, बिपाशा बसू यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. यातील नंदिता आणि बिपाशा या अभिनेत्रींनी त्यांच्या सावळ्या वर्णावरुन बरीच टीका सहन केली होती.

या सर्व वाटचालीबद्दल मनमोकळेपणे सांगताना बिपाशा म्हणाली, ‘मी 15, 16 वर्षांची असताना मॉडेलिंगला सुरुवात केली. मी सुपर मॉडल स्पर्धा जिंकली तेव्हा प्रत्येक वृत्तपत्रात बातमी होती की, कोलकाताची सावळी मुलगी विजेती ठरली आहे. तेव्हा मला आश्चर्य वाटले की, माझ्या नावाचे पहिले विशेषण सावळी हे का आहे. मग मी मॉडेलिंगसाठी न्यूयॉर्क आणि पॅरिसला गेले आणि मला तेथे समजले की माझ्या रंगामुळे मला अधिक काम आणि अटेंशन मिळत आहे. हा मला लागलेला एक वेगळाच शोध होता’, असे ती सांगते.

‘मी भारतात परत आल्यावर मला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. जेव्हा मी माझा पहिला चित्रपट केला तेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे नवीन होते. अचानक मला येथे स्वीकारले गेले आणि पसंतही केले गेले. परंतु, सावळ्या मुलीने पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांना प्रभावित केले, असंच विशेषण जुळले. माझ्यावर आलेल्या बर्‍याच लेखांमध्ये माझ्या कामापेक्षा माझ्या रंगाची जास्त चर्चा होती. मला ते कधीच समजले नाही. माझ्या मते आकर्षक हे व्यक्तिमत्त्व असतं, रंग नव्हे. माझ्या सावळ्या रंगामुळे का मला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळे समजले गेले? मला जास्त फरक समजत नाही, परंतु लोक असा फरक करतात’, असे ती म्हणते.

”एखाद्या अभिनेत्रीने कसे दिसावे आणि कसे वागावे, यासाठी येथे सौंदर्याची एक मानसिकता आहे. पण मी वेगळी होते. लहानपणापासूनच माझ्यात आत्मविश्वास आणि अभिमान आहे. माझा त्वचेचा रंग मला व्यक्त करीत नाही. ती माझी ओळख नाही. मला माझा रंग आवडतो आणि मी तो बदलू इच्छित नाही”, असे मत बिपाशाने व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.