Fake News : 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द होणार असल्याचे वृत्त चुकीचे

एमपीसी न्यूज – आरबीआय (RBI) लवकरच 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार करण्याची शक्यता असल्याचं वृत्त व्हायरल झालं होतं. परंतु, आता सरकारने याबाबत स्पष्टीकरण देत सत्य समोर मांडलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये (PIB Fact Check) हे वृत्त फेक ( Fake News) असल्याचं समोर आलं आहे.

आरबीआय मार्चनंतर सर्व जुन्या नोटा चलनातून बाहेर करणार असल्याचा दावा एका वृत्तातून करण्यात आला होता. पीआयबीने ट्वीट करुन म्हटलं आहे की, हा दावा फेक आहे. आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही स्पष्ट केलं आहे की, 100,10 आणि 5 रुपयांच्या सर्व जुन्या नोटा वैध असून त्या चलनात कायम राहतील. या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा सध्या कोणताही विचार नाही.

पीआयबीने आपल्या ट्विटर हॅण्डलवर याची माहिती देताना ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा नजीकच्या काळात रद्द होणार असल्याच्या काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण देण्यात येत आहे की अशा प्रकारचे वृत्त चुकीचे आहे.’ हा दावा खोटा आहे. आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.