Fake SMS : ‘140’ क्रमांकाबाबत व्हायरल होणारा मेसेज फेक
Fake message about '140' number
एमपीसी न्यूज – 140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल उचचला केला तर आपल्या बॅंक खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन खात्यातील रक्कम शून्य होते, अशा आशयाचा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या संदेशात कोणतेही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे.
तथापि, कोणताही कॉल आल्यास आपली बॅंक खाते विषयक किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहनही सायबर विभागाने केलं आहे.
'१४० या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसिव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते' या समाजमाध्यमांवर व्हायरल संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही, मात्र कोणताही कॉल आल्यास आपली वैयक्तिक माहिती देऊ नये- @MahaCyber1चे आवाहन pic.twitter.com/GvWk3FoIWX
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 11, 2020
मागील काही दिवसांपासून 140 या क्रमांकावरून येणाऱ्या नंबरवरून कोणतेही फोन उचलू नका, अशा प्रकारचे संदेश व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत सायबर विभागाने स्पष्टीकरण देत या संदेशात काहीही तथ्य नसल्याचे सांगितले आहे.
जोपर्यंत आपण बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी, क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे नंबर तसेच सीव्हिव्ही, पिन शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कोणतेही नुकसान होऊ शकत नाही.
तसेच 140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरु नका, हे क्रमांक टेलिमार्केटिंगकरिता दिले गेलेले असतात.
मात्र, 140 किंवा कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास ओटीपीसह आपली वैयक्तिक माहिती, बँक, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स विचारल्यास माहिती देऊ नये असे, आवाहन सायबर विभागाने केले आहे.