Pune News : प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांची पुणेकर भामट्याकडून फसवणूक, वाचा काय घडलं ? 

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य यांची पुण्यात जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अभिजीत यांनी याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार केंजळे नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अभिजीत भट्टाचार्य यांचा पुण्यातील मुळशी तालुक्यात बंगला आहे. त्या ठिकाणी ते आपल्या कुटुंबीयांसोबत येत असतात. 2010 साली आरोपी केंजळे याने अभिजीत यांची भेट घेतली. तुमच्या बंगल्याला लागून माझी जमिन आहे. तुम्हाला जमिन पाहिजे असल्यास मी जमिन विक्रीस तयार आहे, असे केंजळेने त्यांना सांगितले.

अभिजीत ही जमीन विकत घेण्यास तयार झाले. त्यांनी 38 लाख 80 हजार रुपये देऊन जमिन घेतली. जमिनीचे सपाटीकरण करून तेथे कृत्रिम तलाव बांधला. काही दिवसांपूर्वी जमिनीचा सात बारा उतारा अभिजीत यांनी ऑनलाइन पाहिला. तेव्हा काही खरेदीदारांच्या नावासमोर क्षेत्र शिल्लक नसल्याचे निदर्शनास आले.

मुळशीतील तहसीलदार यांच्या निकालावरून अभिजीत यांच्या नावावर 4.66 क्षेत्र शिल्लक ठेवून उर्वरित 32 आर क्षेत्र अतिरिक्त ठरवले. प्रत्यक्षात गणेश केंजळे याने अभिजीत यांना 36 आरची विक्री करून त्यांच्याकडून 38 लाख 80 हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात त्याने 32 आर क्षेत्राची 33 लाख 77 हजार 755 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.