Talegaon : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर शनिवारी शेतक-यांचा मोर्चा

एमपीसी न्यूज – संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर दिवाळी अॅडव्हान्स न दिल्याबद्दल येत्या शनिवारी (दि.९) शेतक-यांचा मोर्चा कारखान्याच्या प्रवेश व्दारावर आयोजित केला आहे, अशी माहिती पत्रक कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक माऊली दाभाडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी गळीत हंगाम २०१८-१९ मधील आलेल्या उसाकरिता रुपये शंभर प्रती टन शेतक-यांना दिवाळीमध्ये अॅडव्हान्स स्वरुपात रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु हे आश्वासन अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याने येत्या शनिवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे दाभाडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

येत्या रविवारी कारखान्याच्या 22 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ होत असून त्या पूर्वीच उस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या वर्षीच्या गाळप हंगामात  कारखान्याने ४ लाख ९९ हजार ५१९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. तर ५ लाख ७१ हजार २०० क्विंटल  साखर उत्पादन केलेले असून या वर्षी कारखाना ब-यापैकी फायद्यात असताना उस उत्पादक शेतक-याला प्रती टन शंभर रुपये वाढवून देण्यास काहीच अडचण येत नसल्याचे दाभाडे यांचे मत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.