Farmers’ Protests : ‘दिल्ली चलो’ आंदोलनातील शेतकरी आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे दाखल

हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘दिल्ली चलो’ आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांवर सरकारी कामात अडथळा आणणे, खुनाचा प्रयत्न करणे असे आरोप ठेवत हरियाणातील पाराओ पोलीस ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये भारतीय किसान युनियनचे राज्य प्रमुख गुरुनाम सिंग चारुनी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे. 26 नोव्हेंबर रोजी कलम 307 (खुनाचा प्रयत्न), कलम 147 (दंगल), कलम 149 (बेकायदा एकत्र येणे), कलम 186 (सरकारी कामात अडथळा), कलम 269 ( संसर्ग पसरवून लोकांचा जीव धोक्यात आणणे) या अन्वये शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत.

अंबाला छावणी भागात मोहरा खेड्यात हजारो शेतकरी एकत्र जमलेले असताना हेड कॉन्स्टेबल प्रदीप कुमार यांच्या तक्रारीवरून दिल्लीकडे आगेकूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलीस उपअधीक्षक राम कुमार यांनी सांगितले की, चारूनी यांना मोर्चा पुढे नेऊ नका असे सांगण्यात आले होते. काही पोलीस अधिकारी हल्ल्यातून वाचले आहेत. आंदोलकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे कलम 188 अन्वये त्यांच्यावर आज्ञाभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, विरोधी पक्ष काँग्रेसकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात असताना, आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील, ‘चलो दिल्ली’चा नारा देत केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

“चलो दिल्ली…केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. 3 दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार.” असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ट्विट केलं आहे.

संसदेत कायदे मंजूर केल्यापासून शेतकरी राज्यांमध्येच आंदोलन करत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना सीमेवरच रोखण्यात आले असून, दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.