Pimpri News: विविध मागण्यांसाठी महापालिका निवृत्त कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

 एमपीसी न्यूज – विविध मागण्यांच्या पुर्ततेकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज (सोमवारी) लाक्षणिक उपोषण केले जात आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हे उपोषण सुरु आहे.

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाचा सन 2016 ते 2020 अशा चार वर्षाच्या वाढलेल्या रकमेचा फरक देण्यात येणार आहे.

महापालिका सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने सातवा वेतन आयोगातील एकूण मिळणा-या रक्कमेतील फरकामधील काही रक्कम अ‍ॅडव्हान्स मिळावी, अशा विनंतीचे पत्र आयुक्त, महापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, तसेच शहरातील तीनही आमदारांना देण्यात आले होते.

कोरोनामुळे मागील वर्षी सेवानिवृत्त महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले. तसेच काही व्यक्तींचे निधनही झाले. मात्र, या वस्तुस्थितीचे महापालिका आयुक्त आणि प्रशासनाला गांभीर्य वाटत नाही.

तसेच या विषयासंबंधी वारंवार पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात आला. तथापि, आयुक्तांनी पदवीधर निवडणुकीचे कारण पुढे करीत रक्कमेचा फरक देण्यास विलंब केला. तसेच महापालिका लेखा विभागाने जानेवारीमध्ये दोन हफ्ते देण्याचे जाहीर केले असतानाही ती रक्कम अद्यापही देण्यात आलेली नाही. याचा निषेध करण्यासाठी उपोषण करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.