Pune Crime News : मुलांनी केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर मुलाने वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी गावात ही घटना घडली. रमेश विठ्ठल जोरकर (वय 55)असे मृत्यूमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. तर याप्रकरणी मारहाण करणारा मुलगा प्रकाश रमेश जोरकर (वय 29) याला पोलिसांनी अटक केली. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 25 नोव्हेंबरच्या रात्री प्रकाश जोरकर हा मित्रांसह घरी आला. त्याने जेवणाची ताटे घराबाहेर घेऊन येण्याचे पत्नीला सांगितले. यावेळी घरात बसलेल्या रमेश जोरकर यांनी तो काय जहागीरदार आहे का? घरात येईल आणि ताटे घेऊन जाईल असे म्हणाले. याच कारणावरून बापलेकात वाद झाला.

यावेळी प्रकाश याने वडिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पत्नी आणि आईने प्रकाशला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना न जुमानता आरोपीने वडिलांना काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत रमेश जोरकर यांना गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. वेल्हा पोलिसांनी या प्रकरणी प्रकाश जोरकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.