Technology News : PUBG नाही, तर आता FAU-G होणार ‘या’ तारखेस लॉन्च

एमपीसी न्यूज : भारत सरकारने PUBG बॅन केल्यावर एनकोअर या भारतीय कंपनीचे सीईओ विशाल गोंडाल व अभिनेता अक्षय कुमारने स्वदेशी अशा FAU-G या मल्टीप्लेअर गेमची घोषणा केली होती. अखेर 26 जानेवारीस हे ॲप लॉन्च होणार असल्याची माहिती अक्षय कुमारने ट्विट करून दिली आहे. प्रजासत्ताक दिवशी हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार असून त्याची नोंदणी सुरू झाली आहे.

या खेळाची निर्मिती करणारी ‘एनकोअर गेम्स’ ही बॅंगलोरस्थित कंपनी आहे. FAU-G या नावाचे पूर्ण रूप FEARLESS AND UNITED: GUARDS असे आहे. या गेमचे गीत (ॲथम सॉंग) इन कोअर गेम्स व अक्षय कुमारने त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून प्रसिद्ध केले आहे. या गेम गीताच्या ध्वनिचित्रफितीमध्ये ‘लडाख’, ‘गलवान घाटी’, ‘लाईन ऑफ ॲक्ट्युअल कंट्रोल’ येथील दृष्ये आहेत. यांतील संवाद हे इंग्रजी व पंजाबी भाषेमध्ये आहेत.

गीताच्या शेवटी भारताचा झेंडा फडकताना दाखवला आहे. या खेळात ॲप वापरकर्ता हा भारतीय सेनेचा हिस्सा बनून भारताच्या भूमीचे आणि सीमेचे रक्षण करू शकणार आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत या गेमची निर्मिती झाली आहे. प्ले स्टोअरवर जाऊन याची नोंदणी करता येणार आहे. 24 तासांच्या आत 1 दशलक्षांहून अधिक लोकांनी याची नोंदणी केल्याचे एनकोअर गेम्सने डिसेंबरमध्ये सांगितले होते.

पबजी गेम बॅन झाल्यावर कंपनीने ‘पबजी मोबाईल इंडिया’ या देशी खेळाची घोषणा केली असून, मंत्रालयाने त्याला अजूनही परवानगी दिली नसल्यामुळे लोकं FAU-G ची आतुरतेने वाट बघत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.