Pune News : झिका व्हायरस रोखण्यासाठी पुरंदर तालुक्यातील ‘या’ गावात वाटले कंडोम

एमपीसी न्यूज : पुणे  जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बेलसर गावात झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील अनेक आरोग्य टीमनं त्याठिकाणी जाऊन नागरिकांच्या विविध चाचण्या केल्या आहेत. तसेच झिका व्हायरसचा इतरांना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत.

याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचं (निरोध) वाटप करण्यात आलं आहे. तसेच पुढील किमान चार महिने गावातील महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. पुरुषांच्या विर्यात झिका विषाणू आढळत असल्यानं पुढील 4 महिने लैंगिक संबंध टाळावेत, किंवा सुरक्षित पद्धतीनं शरीरसंबंध ठेवावेत, असंही वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोरोना विषाणूमुळे राज्याची स्थिती बिकट झाली असताना, झिका विषाणूनं आणखी चिंता वाढवली आहे. बेलासर गावात तर सर्वत्र भीतीच वातावरण पसरलं आहे.

झिकाचा राज्यातील पहिलाच रुग्ण बेलसरमध्ये सापडला होता. यानंतर बेलसर गावाची देशभर चर्चा झाली होती. बेलसरमधील 55 वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य प्रशासनाकडून बेलसर गावात विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.

त्याचाच भाग म्हणून बेलसर गावात पुढचे तीन महिने कुठलीही महिला गरोदर राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनानं केलं आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचं वाटप केलं आहे. एडिस एजिप्त डासापासून झिका विषाणूची लागण होते.

झिका विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना आहे. झिका विषाणूमुळे गरोदर महिलांच्या पोटातील बाळावर अत्यंत वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. बाळाच्या मेंदूची वाढ खुंटू शकते. तसचे अकाली प्रसूती होण्याचा धोकाही अधिक असतो. झिका विषाणू पुरुषांच्या विर्यात तब्बल चार महिने जिवंत राहू शकतो. त्यामुळे गावातील महिलांनी पुढील किमान तीन महिने गर्भधारणा टाळली पाहिजे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायतीनं गावात विविध ठिकाणी फलक लावून गावात जनजागृती मोहिम हाती घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.