Pune: 25 लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून ज्योतिष सांगणाऱ्या महिलेची फसवणूक

Female astrologer woman was defrauded of Rs 25 lakh in pune या महिलेने कधीही कोणतेही लॉटरीचे तिकीट खरेदी केले नव्हते. तरी सुद्धा सायबर चोरट्याने दाखवलेल्या आमिषाला त्या बळी पडल्या.

एमपीसी न्यूज- ज्योतिष सांगणाऱ्या पुण्यातील एका महिलेला सायबर चोरट्यांनी 25 लाखाची लॉटरी लागल्याचे सांगत गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी या महिलेकडून चार लाख रुपये उकळत तिची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 18 एप्रिल ते 12 मे यादरम्यान घडला. 31 वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली असून सायबर चोरट्यांविरोधात कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ज्योतिष सांगण्याचे काम करत असून त्या कोथरूड परिसरात वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना शर्मा नामक व्यक्तीने फोन केला आणि तो एसबीआय मार्केटींग हेड असल्याचे सांगितले.

या महिलेला विश्वासात घेऊन त्याने तुम्हाला कौन बनेगा करोडपतीची 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले. हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला आधी टॅक्स स्वरूपात काही पैसे भरावे लागतील असे सांगितले.

दरम्यान, या महिलेने कधीही कोणतेही लॉटरीचे तिकीट खरेदी केले नव्हते. तरी सुद्धा सायबर चोरट्याने दाखवलेल्या आमिषाला त्या बळी पडल्या. त्याने सांगितल्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यात त्या पैसे भरत राहिल्या.

अशा प्रकारे त्यांनी वेळोवेळी 4 लाख 15 हजार रुपये भरले. परंतु, इतके पैसे भरूनही लॉटरीचे पैसे मिळत नसल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी कोथरुड पोलिस ठाणे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तटकरे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like