Pimpri : गणपती उत्सवासाठी घाट सज्ज; घाटांवर चोख व्यवस्था

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जन घाटाची दुरुस्ती करण्यात आली आहे.  निर्माल्य कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात 26 विसर्जन घाट असून दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी घाट तयार करण्यात आले आहेत. तसेच घाटावर विद्युत दिवे, अग्निशामक दलाचे जवान, जीवरक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. 

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात आज (गुरुवारी) लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यात आले आहे. गणपती उत्सवासाठी पालिकेने पिंपरीतील झुलेला घाट, थेरगाव, चिंचवड, बिर्ला हॉस्पीटल शेजारील, काळेवाडी आदी  परिसरातील घाट स्वच्छ केले आहेत. महापालिकेने केलेल्या दुरुस्तीमुळे आता दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सुद्धा हे घाट गणेशभक्तांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्याचप्रमाणे पालिकेच्या आरोग्य विभागानेही गणपती विसर्जन घाटाची साफसफाई केली आहे. या घाटावर वाढलेले गवत व घाटावर पावसामुळे नदी प्रवाहाबरोबर आलेला गाळ साफ करण्यात आला आहे. गणेश मंडळांना गणपती विसर्जनासाठी रात्री उशीर झाल्यास त्यांच्या सोईसाठी घाटावर विद्युत दिवे लावण्यात आले आहेत.

अग्निशामक दलाकडून गणेश मुर्ती विसर्जनाकरिता जीवरक्षक व साहित्य, उपकरणे यांची ‘या’ घाटावर व्यवस्था करण्यात आली आहे.

1)गणेश तलाव, प्राधिकरण तळे, 2) वाल्हेकरवाडी, जाधवघाट 3)रावेत घाट, जलशुध्दीकरण
केंद्र, 4) किवळेगांव घाट, स्मशानघाट 5) रावेत, भोंडवेवस्ती घाट 6) थेरगांव पुल नदीघाट, 7) मोरया
गोसावी, चिंचवड नदीघाट, 8) केशवनगर, चिंचवडघाट 9) ताथवडे, स्मशानभूमीजवळील घाट
10)पुनावळे गांव, राममंदीर घाट 11) वाकड गावठाण घाट 12) कस्पटेवस्ती घाट 13)सांगवी
स्मशानभूमी जवळील घाट 14) सांगवी आहिल्याबाई होळकर घाट, 15) सांगवी वेताळबाबा मंदीर घाट
16) कासारवाडी स्मशानभूमी जवळील घाट 17) फुगेवाडी, स्मशानभूमीजवळील घाट 18) बोपखेल घाट
19) पिंपरीगांव, स्मशानभूमीजवळील घाट, 20) काळेवाडी स्मशानभूमीजवळील घाट 21) पिंपळेगुरव
घाट 22) काटेपिंपळे घाट क्र.1 23) सुभाषनगर घाट, पिंपरी 24) पिंपळेनिलख घाट 25) मोशी नदी
घाट 26) चिखली स्मशानभूमी जवळील घाट

महापालिकेचे आवाहन!

गणेश मुर्ती पाण्यात विसर्जन करण्याकरिता कमीत कमी कार्यकर्त्यांनी पुढे यावे. शक्यतो व्यवस्थित पोहता येणा-या कार्यकर्त्यांनी गणपती विसर्जन करावे. विद्युत उपकरणे व विद्युत केबल्स पासून दूर रहावे. लहानमुले, अबालवृध्द अथवा आजारी व्यक्तींनी नदीपात्राच्या जवळ जाऊ नये. ज्वालाग्रही पदार्थ किंवा पेट्रोल, रॉकेल, डिझेल, गॅस सिलेंडर इ. विसर्जनाच्या ठिकाणी वापर करू नये. घाटावरील निसरड्या ठिकाणांबाबत सावधानता बाळगावी.
नदीच्या प्रवाहाला वेग असल्याने जास्त दूर अथवा खोल पाण्यात विसर्जनाकरिता जाण्याचा प्रयत्न करू नये.
नशापान किंवा अंमली पदार्थांचे सेवन करून नदी पात्रात उतरू नये किंवा पोहोण्याचा प्रयत्न करू नये.  गणेश मुर्तीचे विसर्जन करताना एकट्याने पोहून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये.

अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, ‘पालिकेच्या सर्व आठ प्रभाग स्तरावर कामे करण्यात आली आहेत. घाटांची दुरुस्ती करण्यात आली आहे. शहरात 26 विसर्जन घाट असून दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी घाट तयार करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, अग्निशामक जवान, वैद्यकीय कर्मचारी, जीवरक्षक तैनात केले जाणार आहेत. तसेच निर्माल्य कुड्यांची देखील व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी कुड्यांमध्येच निर्माल्य टाकावे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.