Pimpri : ‘कोरोना’ची धास्ती; शहरात शुकशुकाट 

एमपीसी न्यूज – जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूने पिंपरी-चिंचवड शहरात शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनोच्या भीतीने नागरिकांचा बाहेरील वावर कमी झाला आहे. पिंपरी चिंचवड येथील शाळा व महाविद्यालये दहावी व बारावी वगळून बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. पार्श्वभूमीवर लोक  गरज भासल्यासच बाहेर पडत असल्सामुळे शहरात आज कमालीचा शुकशूकाट पहायला मिळाला.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या 10 वर गेली असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार ने साथीचे रोग कायदा 1897 कलम 2 अंतर्गत काल मध्यरात्री पासून पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील सिनेमाघर, जलतरण तलाव, व्यायामशाळा, उद्याने,शाळा व महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहरामध्ये आज कमालीचा शुकशुकाट दिसून आला. नेहमींपेक्षा कमी नागरिकांची रस्त्यावर ये-जा दिसून आली. दोन दिवसापूर्वी तुडुंब गर्दीने भरलेले मॉल्स आणि सिनेमाघरे आज रिकामे आढळून आले.

अत्यावशक सेवेमध्ये येणारी बस, रेल्वेच्या सेवा यामधून वगळण्यात आल्या असल्यातरी प्रवासी नसल्याने पीएमपीएल व बस वाहतुकीच्या उत्पनाला चांगलाच फटका बसला आहे. चिंचवडगाव आगार प्रमुखांनी दिलेल्या माहिती नुसार दोन दिवसापासून पीएमपीएल च्या प्रवास्यांमध्ये ३० टक्के घट झाली असून नागरिक गर्दीच्या ठिकाणांबरोबर बसने प्रवास करणेही टाळत आहेत. चिंचवड येथे नव्याने सुरु झालेला एल्प्रो मॉलला सुद्धा फार कमी लोक भेट देताहेत. हजारो रुपये भाडे भरणारे व्यावसायिक गाळेधारकांना यामुळे मोठ्याप्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे.

सिनेमा गृहे बंद केल्याने प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या कमाईवर मोठा परिणाम होणार आहे. शहरातील नाटकांचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. तसेच नवीन येऊ घातलेल्या काही चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोनाची चांगलीच धास्ती नागरीकांनी घेतल्यामुळे उद्यान, मॉल, सिनेमाघर व सार्वजनिक ठिकानांना भेट देण्याचे लोक प्रर्षाने टाळताहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्य असल्यास कंपन्यानी कर्मचार्याना वर्क फ्रॅाम होम म्हणजेच घरून काम करण्याची मुभा द्यावी अशा सूचना दिल्या आहेत.कोरोना विषाणू मुळे जगात आत्तापर्यंत 5000 च्या वर लोकांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा जास्त देशामध्ये याचा प्रार्दुभाव झाला आहे. चीन पाठोपाठ इटली आणि इराण या देशामध्ये हा रोग झपाट्याने वाढत आहे. भारतातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९० वर जाऊन पोहोचली असून महाराष्ट्रात 22 रुग्ण आहेत त्यापैकी पुण्यात 10 कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. भारतात एकूण दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू आत्तापर्यंत झाला असून ते कर्नाटक आणि दिल्ली मधील वय वर्ष साठच्या पुढचे होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.