Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांना फायबर ग्लासचे कवच

Fiberglass shield given to Deepali Dhumal on the backdrop of corona.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातून नगरसेवकांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांच्या भोवती फायबर ग्लासचे कवच करण्यात आले आहे.

नागरिकांना मदत करीत असतानाच दीपाली धुमाळ आणि त्यांचे पती माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्या दोघांनीही वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

त्यानंतर आता पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. कोरोनातून बरे झाल्याने धुमाळ दाम्पत्याने प्लाझ्मा दान करण्याचे ठरविले आहे.

दीपाली धुमाळ यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर धुमाळ यांच्या भोवती फायबर ग्लासचे कवच करण्यात आले आहे. खबरदारी हा म्हणून उपाय केल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांना मदत करण्यासाठी आम्ही सातत्याने पुढाकार घेत आहोत. पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. कधी कोणाला कोरोना होईल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन दीपाली धुमाळ यांनी केले आहे.

पुणे महापालिकेत कोरोना रुग्ण वाढत असल्याने ठेकेदार आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंद केला आहे. नागरिकांनी आपल्या कामासाठी दूरध्वनी, ई- मेल, व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहरात आता कोरोनाचे 62 हजार 37 रुग्ण झाले  आहेत. रोज ही संख्या वाढतीच आहे.  सध्या कोरोनाच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. अन्यथा घरीच राहण्याची गरज असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.