Chikhali : दमदाटी करून दुकान बंद करायला लावणाऱ्या पंधरा आंदोलकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दुकानदारांना धक्काबुक्की आणि दमदाटी करुन दुकान बंद करण्यास भाग पाडल्याप्रकरणी 15 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 29) दुपारी साडेबाराच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे घडला.

पोलीस नाईक राकेश भोपाल बनसोडे यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 15 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात सीएए, एनआरसी, एनपीआर समर्थनार्थ व निषेधार्थ आंदोलन मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद पुकारणे व उपोषण आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करून बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कुदळवाडीमधील पवारवस्ती येथे भगवती ऑटो गॅरेज समोर दहा ते पंधरा जण मोटारसायकलवरून आले.

दुचाकीस्वारांनी संजय परखंडी विश्वकर्मा या दुकानदाराला धक्काबुक्की करत दमदाटी करून दुकान बंद करण्यास सांगितले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.