Nigdi: ‘आरडाओरड करु नका’ म्हटल्यावरुन दोन गटात हाणामारी, परस्परविरोधात गुन्हा दाखल

Fighting in two groups for petty reasons, Filing a FIR against each other in nigdi

एमपीसी न्यूज- आरडाओरड करू नका, आम्हाला झोपायचे आहे, असे म्हटल्यावरून 11 जणांच्या टोळक्याने पाच जणांना कोयता, लाकडी दांडके आणि हाताने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. 23) रात्री साडेअकराच्या सुमारास निगडी येथील संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्कीम येथे घडली. याबाबत रविवारी (दि. 24) निगडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधात फिर्याद दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही बाजूच्या १० जणांना अटक केली आहे.

विरोधी फिर्यादीत पूर्ववैमनस्यातून नऊ जणांनी मिळून तिघांना घरात घुसून कोयता, लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण केल्याचे म्हटले आहे. यात पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

पहिल्या प्रकरणात मंथन गायकवाड (वय 21), नाना गायकवाड (वय 34), नवा कांबळे (वय 19), लखन मस्के (वय 23) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह चेतन गायकवाड, कृष्णा मस्के, कुणाल, भैया, सोन्या कांबळे, भिमाबाई गायकवाड, राजू गायकवाड (सर्व रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिराज वल्ली तांबोळी (वय 39, रा. ओटास्कीम निगडी. मूळ रा. अंधूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सिराज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचे दाजी रमजान तांबोळी यांच्या घरासमोर आरोपी कुणाल, भैय्या आणि त्याचे इतर दोन मित्र मोठ्याने गोंधळ घालून आरडाओरडा करीत होते. याबाबत रमजान यांनी आरडाओरडा करणाऱ्या तरुणांना ‘आरडाओरडा करू नका, आम्हाला झोपायचे आहे’ असे म्हटले.

याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या साथीदारांसह फिर्यादी सिराज, त्याचे मित्र अब्दुल मासुलदार, अमजद मोहिद्दिन शेख, बहीण शबाना तांबोळी, दाजी रमजान तांबोळी यांना लोखंडी कोयत्याने, लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण केली. यामध्ये सर्वजण जखमी झाले आहेत. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांवर दगडफेक केली. यामध्ये फिर्यादी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या रिक्षाचे नुकसान झाले.

याच्या परस्पर विरोधात लखन बळीराम म्हस्के (वय 23, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शकील उर्फ रमजान जलाल तांबोळी (वय 38), सिराज वल्ली तांबोळी (वय 20), अमजद मुद्दीन शेख (वय 30), अरबाज शेख (वय 20), सिराज शेख (वय 19), कासिम जाफर शेख (वय 30), अब्दुल आयुब मसुलदार (वय 24), शमीम शेख (वय 30), सद्दाम पटेल (वय 38, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी शकील, अमजद, अरबाज, सिराज, कासिम, अब्दुल या सहा जणांना अटक केली आहे.

म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी म्हस्के यांच्या घरात घुसून त्यांना कोयता, लोखंडी पाईप आणि दगडाने मारून जखमी केले. भीमाबाई गायकवाड आणि उमेश साठे यांच्या घरात घुसून आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान केले आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like