Maval News : तळेगाव मधील ‘त्या’ बोगस मेडिकल कॉलेजवर गुन्हा दाखल करा – न्यायालयाचे आदेश

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रोपॅथी मधील अभ्यासक्रम चालवण्यास राज्य व केंद्र शासनाने प्रतिबंध केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने इलेकट्रोपॅथी या विषयात कोणतीही पदवी किंवा डिप्लोमा प्रदान केला जावू नये असे निर्देश दिले आहेत. तरीही तळेगाव दाभाडे जवळील सोमाटणे येथे साई इलेक्ट्रोपॅथी मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आले.

या कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ इलेक्ट्रोपॅथी मेडिसिन अँड सर्जरी, एम.डी (इलेक्ट्रोपॅथी) यांसारखे अभ्यासक्रम चालवले जात होते. ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

संतोष भिलूसिंग राठोड हे साई इलेक्ट्रोपॅथी मेडिकल कॉलेज, तळेगाव दाभाडे जवळील सोमाटणे यांचे संचालक असून  साई इलेक्ट्रोपॅथी मेडिकल कॉलेज, पुणे हे बॅचलर ऑफ इलेक्ट्रोपॅथी मेडिसिन अँड सर्जरी, एम.डी (इलेकट्रोपॅथी) यांसारखे वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रम चालवत होते. वास्तविक पाहता इलेक्ट्रोपॅथी मधील अभ्यासक्रम चालवण्यास राज्य व केंद्र शासनाने प्रतिबंध केला आहे. तसेच मे.सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोपॅथी या विषयात कोणतीही पदवी किंवा डिप्लोमा प्रदान केला जावू नये असे निर्देश दिलेले असून मे.उच्च न्यायालयाने  इलेक्ट्रोपॅथीचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था बंद करण्याचे निर्देश दिले होते.

असे असतानाही सरकार व न्यायालयाचे निर्देश उल्लंघून राठोड हा इलेक्ट्रोपॅथीचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त असल्याचे खोटे भासवून त्याची जाहिरात करून गरजुंकडून पैसे घेवून बॅचलर ऑफ इलेक्ट्रोपॅथी मेडिसिन अँड सर्जरी /एम.डी (इलेकट्रोपॅथी) अशा अभ्यासक्रमास बेकायदेशीर प्रवेश देवून ते अभ्यासक्रम चालवत होता.

याविषयी सामाजिक कार्यकर्ते डॉ अभिषेक हरिदास व अनिल भांगरे यांना माहिती कळताच त्यांनी सदर वस्तुस्थिती तपासून कोथरूड पोलीस अधिकारी व तळेगाव दाभाडे येथील पोलीस अधिकारी  शहाजी पवार व पोलीस उपायुक्त यांना वर्दी दिली मात्र त्यांनी गुन्हा न नोंदवल्याने अखेर वडगाव मावळ कोर्टात फौजदारी अर्ज दाखल केला सदर अर्जावर न्या . शुभांगी कातकर यांनी (दि 21) रोजी गुन्हा दाखल करण्या संदर्भात तळेगाव दाभाडे पोलिसांना निर्देशित केले आहे.

” गोर गरीब विद्यार्थ्यांकडून पैसे उकळून अश्या प्रकारे अनधिकृत शैक्षणिक संस्था द्वारे विद्यार्थ्यांची व जनतेची फसवणूक होत असताना वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री काय करीत आहेत असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.