Pimpri news : तीन कोटींच्या लूट प्रकरणी ‘स्पर्श’च्या संचालकांवरही फौजदारी गुन्हे दाखल करा – संदीप वाघेरे

महापालिकेची प्रचंड बदनामी झाल्याने स्पर्श हॉस्पिटलला कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकावे

एमपीसी न्यूज – भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या ठिकाणच्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये एकही रुग्ण दाखल नसताना खोटी बिले सादर करून फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअरने महापालिकेकडून 3 कोटी 28 लाख रुपये घेतले आहेत. ही महापालिकेची लूट असून याप्रकरणी ‘स्पर्श’च्या संचालकांवरही फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. याप्रकरणी महापालिकेची प्रचंड बदनामी झाल्याने स्पर्श हॉस्पिटलला कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापौर उषा ढोरे यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक वाघेरे  यांनी म्हटले आहे की, महापालिकेने स्पर्श हॉस्पिटलच्या ऑटोक्लस्टर कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी व बाहेरील डॉक्टरांनी कोरोना रुग्णास रुग्णालयात दाखल करण्यासाठी एक लाख रुपये मागितल्याप्रकरणी चार डॉक्टरांवर गुन्हे दाखल करुन अटक केली.

रेमडेसिविर औषधाच्या काळाबाजार केल्याप्रकरणी एका कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल केला आणि स्पर्श हॉस्पिटलकडून ऑटोक्लस्टर हॉस्पिटलचे काम काढून घेतल्याबद्दल महापौर, महापालिका, पोलीस आयुक्तांचे मी अभिनंदन करतो. स्पर्श हॉस्पिटलने मागील वर्षी कोरोना महामारीच्या काळात भोसरी येथील रामस्मृती मंगल कार्यालयात व हिरा लॉन्स येथील कोविड सेंटरमध्ये बोेगस डॉक्टर्स व नर्सेस आदी स्टाफ दाखवून त्या दोन्ही कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल न होता सुमारे 5 कोटी 14 लाख रुपयांचे बिल महापालिकेला दिले.

65 टक्के म्हणजे सुमारे 3 कोटी 28 लाख रुपयांचे बिल काहीही काम न करता घेवून महापालिकेची लुट केलेली आहे. या प्रकरणाची आपण राज्य शासनाचा ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी नेमूण सखोल चौकशी करावी. तसेच या प्रकरणात कोट्यावधींचा लाभ घेणारे स्पर्श हॉस्पिटलचे संचालक व या प्रकरणी त्यांना भ्रष्टाचार करण्यास मदत करणारे महापालिकेचे संबंधीत अधिकारी यांच्यावर जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या पैशांची कोरोना काळात लुट केल्याबद्दल फौजदारी स्वरुपाचे फसवणुकचे गुन्हे दाखल करावेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी पुर्ण होत नाही. तोपर्यंत स्पर्श हॉस्पिटलला जुन्या कामाबद्दल एकही रुपया बिल अदा करु नये व जुन्या जादा लुटलेल्या वसूल पात्र रकमा चौकशी नंतर वसूल कराव्यात. हॉस्पिटलला काम देताना निविदेतील तरतूदीपैकी जेवढा स्टाफ, डॉक्टर्स होता तेवढा स्टाफ व डॉक्टर्स त्या ठिकाणी नव्हते. परंतु; त्यांनी बिल पुर्ण संख्येने घेतलेले आहे. त्यामुळे जेवढा स्टाफ व डॉक्टर्स कामावर तेवढेच बिल देवून उर्वरीत प्रकरणी दंडात्मक कारवाई करावी.

तसेच; काम दिल्याच्या पहिल्या दिवसापासूनची जादा बिलांची वसूली करावी. तसेच; या प्रकरणी महापालिकेची प्रचंड बदनामी झाल्याने स्पर्श हॉस्पिटलला कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकावे अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.