_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : पत्रकार असल्याचे सांगत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या कथित पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : “मी पत्रकार आहे, मी लॉ केले आहे, तुम्ही मला अडवू शकत नाही” असे म्हणत नाका-बंदीवर तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कथित पत्रकारांसह दोघांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास शिवाजी रस्त्यावरील फडगेट पोलीस चौकी समोर हा प्रकार घडला. 

श्रीराम अशोकसिंग परदेशी (वय 36) आणि जतीन कुंदन परदेशी (वय 21) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोविंद गोसावी यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे शिवाजी रस्त्यावर कर्तव्य बजावत होते. यावेळी एका चारचाकी वाहनातून पाच जण प्रवास करत होते. फिर्यादीने त्यांची गाडी अडवली असता यातील श्रीराम परदेशी याने गाडीतून खाली उतरून पोलिसांसोबत हुज्जत घातली.

‘ मी पत्रकार आहे, मी ला केले आहे तुम्ही मला अडवू शकत नाही, तुम्ही कसली कारवाई करता मीच तुमच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करतो” असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरडा करून गर्दी जमून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.  पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून खडक पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.