Wakad Crime News : धनादेश न वटल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बँक खात्यावर पैसे कमी असताना त्यापेक्षा जास्त रकमेचा धनादेश दिला. खात्यावर रक्कम कमी असल्याने तो धनादेश वटला नाही. याप्रकरणी एकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 फेब्रुवारी 2018 ते 17 मे 2022 या कालावधीत वळूमाता केंद्र ताथवडे येथे घडला.

प्रदीप भगवान अवघडे (रा. सिंहगड रोड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वळूमाता केंद्र ताथवडे चे प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. हरिश्चंद्र जनार्दन अभ्यंकर (वय 51, रा. पिंपळे निलख) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वळूमाता केंद्र ताथवडे या प्रक्षेत्र येथील लाकूड, रिकामे बारदान, लोखंडी भंगार साहित्याची आरोपीने लिलाव पद्धतीने चार लाख 64 हजार 373 रुपये इतक्या मालाची उचल केली. त्यापैकी त्याने एक लाख 65 हजार रुपये रक्कम भरणा केला तसेच आरोपीच्या बँक खात्यावर योग्य रक्कम नाही हे त्याला माहिती असताना त्याने प्रक्षेत्र वळूमाता केंद्र ताथवडे यांच्या नावाने 2 लाख 99 हजार 373 रुपयांचा धनादेश दिला. तो धनादेश वटला नाही. धनादेश परत आला असून त्याच्याकडून येणे रक्कम न भरता टाळाटाळ करून प्रक्षेत्र वळूमाता केंद्र ताथवडे यांची पर्यायाने शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.