Talegaon News : न्यायालयाच्या आदेशानंतर ‘त्या’ मेडिकल कॉलेजवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रोपॅथी मधील अभ्यासक्रम चालवण्यास राज्य व केंद्र शासनाने प्रतिबंध केला आहे. तरीही तळेगाव दाभाडे येथे साई इलेक्ट्रोपॅथी मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आले. ही बाब निदर्शनास आल्याने वडगाव मावळ न्यायालयाने या कॉलेजवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कॉलेजच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष भिलूसिंग राठोड (रा. सोमाटणे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. अभिषेक संतोष हरिदास (वय 38, रा. कोथरूड पुणे) यांनी बुधवारी (दि. 29) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष राठोड आणि अन्य लोकांनी सोमाटणे येथे साई इलेक्ट्रोपॅथी मेडिकल कॉलेज चालवले. आरोपीने फिर्यादी आणि इतर विद्यार्थ्यांना इलेक्ट्रोपॅथीमधील पदवी केंद्र सरकार मान्यताप्राप्त असल्याचे बनावट कागदपत्राद्वारे भासवले. तसेच डॉक्टर होण्याची एक सुवर्णसंधी अशा आशयाची जाहिरात दाखवून  फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

इलेक्ट्रोपॅथी मधील अभ्यासक्रम चालवण्यास राज्य व केंद्र शासनाने प्रतिबंध केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने इलेकट्रोपॅथी या विषयात कोणतीही पदवी किंवा डिप्लोमा प्रदान केला जावू नये असे निर्देश दिले आहेत. तरीही तळेगाव दाभाडे येथे साई इलेक्ट्रोपॅथी मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आले.

या कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ इलेक्ट्रोपॅथी मेडिसिन अँड सर्जरी, एम.डी (इलेक्ट्रोपॅथी) यांसारखे अभ्यासक्रम चालवले जात होते. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल कारण्याचे 21 सप्टेंबर रोजी आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.