Pune Crime News : ‘त्या’ चौघांचा मृत्यूप्रकरणी घर मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शौचालयाची टाकी साफ करताना चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी घर मालकावर गुन्हा दाखल केला आहे. शौचालयाच्या टाकीत उतरण्यासाठी भाग पाडून चौघांचा मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. भीमाजी जयसिंग काळभोर (वय 37) असे अटक करण्यात आलेल्या घरमालकाची नाव आहे. याप्रकरणी राजनंदनी पद्माकर वाघमारे (वय 26) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, लोणी स्टेशन येथील कदमवाक वस्ती परिसरात सेफ्टी टॅंकची सफाई करण्यासाठी टॅंकमध्ये उतरलेल्या रूपचंद नवनाथ कांबळे, सिकंदर पोपट कसबे, पद्माकर मारुती वाघमारे आणि कृष्णा दत्ता जाधव या चौघांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, या दुर्घटनेत मृत्यू पावलेले पद्माकर वाघमारे हे एमआयटी महाविद्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी ते रात्रपाळी ची ड्युटी पूर्ण करून सकाळी घरी आले होते. सकाळी आंघोळ करून जेवण करून ते झोपले होते. त्यावेळी घर मालक भिमाजी काळभोर त्या ठिकाणी आले आणि त्यांना उठू लागले. तेव्हा त्यांच्या पत्नी राजनंदिनी यांनी ते रात्रपाळी करून आले त्यांना उठू नका असे सांगितले. त्यानंतर राजनंदिनी या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर कडे लावून निघून गेल्या होत्या.

अकरा वाजण्याच्या सुमारास त्या परत आले असता इमारतीमध्ये त्यांना खूप लोक जमले दिसले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडून त्यांना शौचालयाच्या टाकीत कामगार पडल्याने घर मालकाने त्यांच्या पतीस झोपेतून उठून कामगारांना काढण्यासाठी जबरदस्तीने टाकीमध्ये उतरवल्याचे समजले.

उपस्थित असणाऱ्यांपैकी अमर भोसले यांनी जीव धोक्यात घालून पद्माकर यांना बेशुद्ध अवस्थेत वर आणले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रमेश वाघमारे यांच्यासह अन्य तिघांच्या मृत्यूला दोषी धरत घरमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.