Pimpri : पालिकेत हुल्लडबाजी, सत्ताधा-यांवर जमावबंदी, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची पोलिसांकडे मागणी 

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवडच्या महापौर, उपमहापौर निवडी वेळी पालिका परिसरात ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडून स्पिकरवर गाणी लावण्यात आली होती. त्यामुळे मुख्यालयातील कर्मचा-यांना त्रास होऊन सरकारी कामात अडथळा आला आहे. तसेच पालिकेत हुल्ल्डबाजी करत भंडारा उधळून सरकारी मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांवर सरकारी कामकाजात अडथळा, सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पोलिसांकडे केली आहे. 

याबाबत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना निवेदन दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शहरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यासाठी आंदोलन केले. त्यामुळे सत्ताधा-यांच्या दबावाखातार पोलिसांनी आमच्यावर जमावबंदीचा गुन्हा दाखल केला आहे. आजतर पालिकेत मोठा जमाव जमा झाला होता. हा जमावबंदीचा आदेश भाजपलासुद्धा लागू होतो. पोलिसांसमोर जेसीबी लावून पालिका आवारात भंडारा उधळण्यात आला. हजारो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हुल्लडबाजी केली. त्यामुळे पालिका मुख्यालयाचे कामकाज बंद करावे लागले. एवढेच नव्हे तर उधळलेल्या भंडा-यामुळे पाच कर्मचारी घसरुन पडल्याने जखमी झाले आहेत. त्यामुळे जमावबंदीचा आदेश राष्ट्रवादीला लागू होत असेल तर सत्ताधारी भाजपला सुद्धा लागू झाला पाहिजे.

त्याचबरोबर पालिकेच्या सरकारी कामकाजात अडथळा, सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि  जमावबंदीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. ही सर्व हुल्लडबाजी ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यात कैद झाली आहे. त्यामुळे पुरावा देखील आहे, असेही साने यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच गुन्हा दाखल नाही केल्यास आयुक्तलाच्या कार्यालयात ठिय्या मांडणार असल्याचेही, त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.