Chikhali News : ‘मी इथला दादा आहे, मला घाबरायचं’ असे म्हणत मारहाण

चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – ‘तू मला ओळखत नाही का. मी इथला दादा आहे. मला घाबरायचं’ असे म्हणत चार जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 7) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास त्रिवेणीनगर, तळवडे येथे घडली.

दत्तात्रेय शिवाजी देवकर (वय 31, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुड्ड्या भालेराव (वय 26, रा. त्रिवेणीनगर, तळवडे), तोफीक शेख (रा. ओटास्कीम, निगडी), रुपेश आखाडे (रा. त्रिवेणीनगर, तळवडे) आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री फिर्यादी जेवण झाल्यानंतर घराच्या समोर एकटे थांबले होते. त्यावेळी आरोपी गुड्ड्या तिथे आला. त्याने ‘तू मला ओळखत नाही का. मी इथला दादा आहे. मला घाबरायचं’ असे म्हणत फिर्यादी यांना धमकी दिली. फिर्यादी यांना विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केली.

फिर्यादी यांनी आरोपी गुड्ड्याला प्रतिकार केला असता त्याने त्याच्या अन्य तीन साथीदारांना बोलावून फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले. आरोपी गुड्ड्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात एक मारहाण, एक घरफोडी आणि एक खुनाचा प्रयत्न असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी रुपेश याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.