Pune News : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. मांजरेकर यांच्या गाडीला पाठीमागून धक्का दिल्याने निर्माण झालेल्या वादातून महेश मांजरेकर यांनी मारहाण केली असा आरोप संबंधित व्यक्तीने केला आहे.  या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री पुणे-सोलापूर महामार्गावर घडलाय.

मांजरेकर यांच्या गाडीला पाठीमागून एका चारचाकी वाहनाने धडक दिली होती. दरम्यान कैलास सातपुते नामक एका युवकाने यवत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून मांजरेकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.

महेश मांजरेकर हे कारने सोलापूर रस्त्याने जात असताना त्यांनी कारला अचानक ब्रेक लावल्यामुळे माझी गाडी त्यांच्या गाडीला जाऊन धडकली. यामध्ये त्यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. या कारणावरून महेश मांजरेकर यांनी शिवीगाळ करत गालावर चापट मारली असल्याचे कैलास सातपुते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

गाडीला धडक बसल्यानंतर मांजरेकर खाली उतरून गाडीची पाहणी करत होते. यावेळी त्यांचा फिर्यादीसोबत वाद झाला. त्यानंतर मांजरेकर यांनी शिवीगाळ करत आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महेश मांजरे एका व्यक्तीला तू दारू पिऊन गाडी चालवतोस का? असे विचारताना दिसतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.