Vadgaon Maval : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 34 उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दुसया दिवशी गुरूवारी (दि 24) रोजी 34 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

मावळ तालुक्यातील  57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवार (दि 23) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. वडगाव मावळ येथील महसूल भवनमध्ये अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता.

मात्र अर्ज दाखल करण्याचा दुसऱ्या दिवशी गुरुवार (दि 24 ) कुसगाव ब्रु ग्रामपंचायतसाठी सर्वाधिक 11 अर्ज, टाकवे बुद्रुकसाठी 9 अर्ज दाखल झाले असून नवलाख उंब्रे ग्रामपंचायतसाठी 4 अर्ज, सांगावडे ग्रामपंचायतसाठी 1 अर्ज, साई ग्रामपंचायतसाठी 2 अर्ज, चिखलसे 1 अर्ज, खडकाळा 1 अर्ज, साते ग्रुपग्रामपंचायत 1 अर्ज, कुरवंडे 3 अर्ज व बौरसाठी 1 अर्ज असे एकूण 34 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी प्रतिज्ञापत्रक तसेच विविध दाखले घेण्यासाठी वडगाव येथे गुरूवारी सकाळ पासूनच खूप मोठी गर्दी झाली होती; परंतु बुधवारी व गुरूवारी नागरी सुविधा केंदात वीज नसल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रे न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली.

दि 25 डिसेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत शासकीय सुट्टी असल्याने मोठी अडचण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर आहे. त्यामुळे दि 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर हे तीनच दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहिले आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.

बिनविरोध ग्रामपंचायतीला 11 लाखाचे बक्षीस

गेल्या दोन दिवसात तालुक्यात महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. काही ग्रामपंचायती बिनविरोध तर काही ठिकाणी कमीत कमी उमेदवार देऊन पॅनेल तयार करण्यासाठी बैठका देखील सुरू आहेत. तर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी बिनविरोध ग्रामपंचायतीला 11 लाखाचे बक्षीसही जाहीर केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.