Film On Kanhoji Angre : सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पराक्रम पडद्यावर येणार

Sarkhel Kanhoji Angre's prowess will come on screen छत्रपती शिवाजी महाराज अनेक बाबींमध्ये द्रष्टे वीर पुरुष होते.

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज अनेक बाबींमध्ये द्रष्टे वीर पुरुष होते. त्यांनी आपल्या मावळ्यांची मोठी फौज उभी करुन महाराष्ट्राला परकीयांच्या जोखडातून मुक्त केले. त्यांना अनेक लढवय्या शिलेदारांची साथ मिळाली. पुढे संभाजी महाराजांनी पण आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राला उन्नतीकडे नेले. त्यांना देखील अनेक साथीदारांची मोलाची साथ मिळाली. त्यातीलच एक म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे होत. कान्होजींनी आपल्या अतुलनीय पराक्रमाच्या जोरावर संपूर्ण समुद्रावर मराठा आरमाराचे वर्चस्व निर्माण केले.

समुद्रातील गनिमी काव्याचे जनक कान्होजी आंग्रे यांचा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताचे पहिले नौदल प्रमुख,  ज्यांचा समुद्रातील शिवाजी म्हणून अखंड मुलखात परिचय होता, ज्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त समुद्रालाच ठाऊक होता असे भारताचे पहिले नौदल प्रमुख म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा लवकरच कान्होजी आंग्रे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

कान्होजी आंग्रे यांची धास्ती संपूर्ण युरोपच्या नौसेनेला होती. विशेष म्हणजे कान्होजी आंग्रे यांचा पराभव करण्यासाठी इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज हे सगळे एकत्र आले होते. मात्र तरीदेखील ते दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचा पराभव करु शकले नाही. त्यामुळेच त्यांचा इतिहास सर्वसामन्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने कान्होजी आंग्रे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

डॉ. सुधीर निकम लिखित हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच चित्रपटाची निर्मिती क्रिटीव्ह मदारीस प्रस्तुत राहुल जाधव आणि पर्यवेक्षक निर्माते राहुल भोसले करत आहेत. मात्र अद्याप केवळ चित्रपटाची घोषणा झाली असून यात कोणत्या कलाकारांची वर्णी लागली आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. याआधी अजय देवगण यांनी तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पडद्यावर आणली होती. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.